मुंबई : बॉलिवूडमध्ये निर्माता करण जोहर आणि अभिनेत्री काजोल यांच्या मैत्रीकडे कायमच आदराने पाहिलं जातं. परंतु मागील काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात कधीही न भरुन निघणारी दरी आली होती. स्वत: करणने 'द अनसूटेबल बॉय' या आत्मकथेत काजोलसोबतची 25 वर्ष जुनी मैत्री तुटल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. परंतु नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार करण आणि काजोलमध्ये आता पॅचअप झालं आहे.


करणने काजोलच्या बर्थ डे पार्टीत जाऊन जुन्या मैत्रिणीसोबतचे रुसवे-फुगवे दूर केले. तर काजोलनेही करणच्या मुलांचा पहिला फोटो लाईक करुन त्यांच्यातील कटुता दूर झाल्याचं जाहीर केलं. यादरम्यान आणखी एक बातमी आहे की, शाहरुख खानच्या 'टेड टॉक्स' शोमध्ये पाहुणा म्हणून आलेल्या करण जोहरने काजोलला एक खास पत्र लिहिलं. ज्यात त्याने आत्मकथेत काजोलसाठी लिहिलेल्या कठोर शब्दांवर खेद व्यक्त केला.

काजोल करण जोहरसोबत कधीच सिनेमा करणार नाही!


'टेड टॉक्स' या एपिसोडची थीम 'चेंजिंग रिलेशनशिप' होती, ज्यात सेलिब्रिटी पाहुण्याल बोलून किंवा लिहून आपल्या भावना जाहीर करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. यावेळी करण जोहरने काजोलच्या नावाने पत्र लिहिलं. या पत्रात असं लिहिलं होतं की, "काजोल अजूनही माझी जवळची मैत्रिण असून 25 वर्षांची ही मैत्री अतिशय खास आहे." करणने या पत्राद्वारे त्याच्या आत्मकथेत काजोलसाठी लिहिलेले कठोर शब्दांची तीव्रता कमी करण्याचाही प्रयत्न केला.

"काजोलसोबत आता माझं कोणतंही नातं नाही. आमच्यामध्ये दरी निर्माण झाली आहे. असं काहीतरी घडलं ज्यामुळे मी फारच निराश झालो. मात्र त्याचा खुलासा मला करायचा नाही. कारण मला वाटतं की हे आमच्यासाठी योग्य ठरणार नाही. 25 वर्षांनंतर आता काजोल आणि मी बोलत नाही," असं करणने त्याच्या पुस्तकात स्पष्ट लिहिलं आहे.