सैराट पाहून करण जोहर, रणबीर, वरुण, आलिया म्हणतात...
एबीपी माझा वेब टीम | 15 Jun 2016 06:01 AM (IST)
मुंबई : आर्ची आणि परशा यांच्या 'सैराट'ची जादू सिनेमा प्रदर्शित होऊन कित्येक आठवडे उलटले तरीही कायम आहे. बॉलिवूडमधील कित्येक कलाकारांना या सिनेमाने भुरळ घातली आहेच. आता रोमँटिक चित्रपटांचा बादशाह करण जोहरने रणबीर, वरुण धवन, आलिया यासारख्या काही कलाकारांसोबत सैराट पाहिला. मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानपासून कपिल शर्मापर्यंत अनेक कलाकारांनी सैराटचे गोडवे गायल्यानंतर करण जोहरनेही सिनेमा पाहण्याची इच्छा व्यक्त केली. रणबीर कपूर, वरुण धवन, आलिया भट, आदित्य रॉय कपूर यासारख्या कलाकारांनाही त्याने निमंत्रण दिलं होतं. सैफ अली खान आणि त्याची घटस्फोटित पत्नी अमृता सिंग यांची लेक साराही या स्क्रीनिंगला उपस्थित होती. करण जोहर आणि वरुण धवन यांनी सैराट पाहल्यानंतरचा अनुभव ट्विटरवर शेअर केला आहे. 'सैराट पाहिल्यानंतरच्या धक्क्यातून अद्याप सावरत आहे. काल रात्री (सोमवारी) सिनेमा पाहिला आणि जड अंतकरणाने उठलो. चित्रपटाविषयी मनात प्रचंड आदर आहे' असं करणने म्हटलं आहे. https://twitter.com/karanjohar/status/742570309769777152 अभिनेता वरुण धवनने 'सैराट... वॉव वॉव वॉव' इतक्याच शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. इतर कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या नसल्या, तरी त्यांना सिनेमा मनापासून आवडल्याचं 'स्पॉटबॉय.कॉम' वेबसाईटने म्हटलं आहे. https://twitter.com/Varun_dvn/status/742445408513753091