मुंबई : सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात अभिनेत्री कंगना रनौत हिने उडी घेतल्यामुळे या प्रकरणाला चांगलीचं हवा मिळाली होती. सुशांतच्या आत्महत्येवरुन बॉलिवूडमधील घराणेशाहीवर देखील तिनं बोट ठेवलं होतं. सुशांतची आत्महत्या नाही तर प्लॅन मर्डर असल्याचा गंभीर आरोपही कंगनाने त्यावेळी केला होता. दरम्यान "सुशांतच्या मृत्यूसंदर्भातील माझा दावा खोटा निघाला तर सरकारने केलेला सन्मान (पद्मश्री) परत देईल, असं ती म्हणाली होती. यावरुन सोशल मीडियावर ती ट्रोल देखील झाली होती. आता पुन्हा एकदा ट्वीटर वर #KanganaAwardWapasKar या ट्रेंड चालवण्यात येत आहे.


सुशांत सिंग राजपूतने आपल्या मुंबईतील घरात गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेकांनी त्याच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यात आघाडीवर होती अभिनेत्री कंगना रनौत. कंगनाने सुशांतच्या मृत्यूबाबत प्रतिक्रिया देताना बॉलिवूडवर निशाणा साधाला. सुशांतने आत्महत्या केली नाही तर त्याचा खून झालाय असा गंभीर आरोप तिने बॉलिवूडवर केला. काही जण सुशांत कमकुवत असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ज्या व्यक्तीने स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्कॉलरशीप घेतली आहे. इंजिनिअरिंगमध्ये रॅन्क होल्डर आहे, तो मानसिकदृष्ट्या कमकुवत कसा असू शकतो? आत्महत्येआधी सुशांतची जी परिस्थिती होती, त्यासाठी बॉलिवूड जबाबदार आहे. सुशांतवर बोट दाखवणाऱ्या सर्वांचाच कंगनाने चांगलाच समाचार घेतला होता. याच दरम्यान कंगनाने माझे दावे जर खोटे असतील तर मी पद्मश्री परत देईल, असेही म्हटले होते. त्यावेळी ती ट्रोल देखील झाली.


#KanganaAwardWapasKar ट्वीटर वर ट्रेंड


सुशांतच्या आत्महत्येवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर अनेक केंद्रीय संस्था याचा तपास करत होत्या. दरम्यान पुलाखालून बरेच पाणी गेले असून सुशातने आत्महत्याचं केला असल्याचं एम्सने आपल्या अहवालात सांगितले आहे. तर दुसरीकडे सुशांतसिंग प्रकरणात ड्रग्जच्या केसमध्ये अटक असलेल्या रिया चक्रवर्ती हिलाही जामीन मिळाल्यानंतर तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. कदाचित याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर कंगनाला ट्रोल करण्यात येत आहे. सोशल मीडियावर अनेक मीम्स देखील शेअर करण्यात येत आहे.


कंगनाकडून ट्रेंडची दखल
ट्रोलींग सुरु झाल्यानंतर कंगनाने त्याची दखल घेतली असून त्यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. एका टिव्हीला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडीओ पोस्ट करत. ही माझी मुलाखत आहे. जर तुमची स्मरणशक्ती कमजोर असेल तर पुन्हा पाहा. जर मी खोटे आरोप लावले असतील तर मी माझे पुरस्कार परत करेल. हे एका क्षत्रियाचे वचन आहे. मी रामभक्त आहे. प्राण जातील पण वचन जाणार नाही, जय श्री राम., असं ट्विट कंगनाने केलं आहे.