मुंबई : कंगना रनौतला आता ट्विटरपाठोपाठ इन्स्टाग्रामचाही फटका बसला आहे. कंगनाच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर ट्विटरने तिचं अकाऊंट सस्पेंड केलं होतं. त्यानंतर त्यावर संताप व्यक्त करताना, व्यक्त व्हायला आणि आपल्या सिनेमांचं प्रमोशन करण्यासाठी इतर व्यासपीठंही आहेत. आपण तिथे आपल्याला वाटतं ते बोलत राहू असं म्हटलं होतं. त्यानुसार कंगना तातडीने इन्स्टाग्रामवर आली. 


इन्स्टावर येऊन काही दिवस लोटतात न लोटतात तोच आता इन्स्टाग्रामने थेट तिची एक पोस्ट डिलीट करून टाकली आहे. त्याचं झालं असं की, कंगनाने इन्स्टाग्रामचा वापर जोरदार चालवला होता. यातच आपण कोविड पॉझिटिव्ह आल्याची माहितीही तिने इन्स्टावरून शेअर केली. स्थितप्रज्ञ मुद्रेतला एक फोटो तिने शेअर केला होता. कोविडची माहिती देतानाच हा व्हायरस आता माझ्या आत पार्टी करतोय आणि मला त्याची कल्पना नव्हती. पण आता मी याला पळवून लावेन, अशा आशयाची पोस्ट लिहिली होती. वाद त्यावरून नव्हता. कोविडबद्दल बोलताना कोरोना हा एक छोटा फ्लू असल्याचं विधान तिने केलं होतं. त्यावरून कंगनावर बरीच टीका झाली. 


कंगनाने ही पोस्ट केल्यानंतर अनेक लोक तिच्यावर भडकले. ते साहजिकच होतं. कारण, कोरोनाने प्रत्येकाने आपला कोणीतरी मित्र, स्वकीय, नातेवाईक गमावला आहे. त्यामुळे कंगनाचं हे विधान हे एका अर्थाने त्यांच्या दु:खावर मीठ चोळण्यातला प्रकार होता. त्याची दखल इन्स्टाग्रामने घेतली आणि तिची ती स्टोरी इन्स्टाने तातडीने खाली ओढत डीलीट केली. ही बाब कंगनाला कळल्यावर पुन्हा तिचा तीळपापड होणं साहजिक होतं. या गोष्टीची दखल घेत कंगनाने इन्स्टाग्रामवरही आपण फार काळ टिकणार नाही, बहुधा असं स्पष्ट केलं आहे. मी इन्स्टावर येऊन दोन दिवस झाले नाहीत तर त्यांनी माझी पोस्ट डीलीट केली. मी बहुधा फारतर आठवडाभर या इन्स्टावर टिकेन असं ती म्हणते. 


ट्विटरवर कंगना सातत्याने बोलत होती. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर तिने ट्विटरचा यथेच्छ वापर केला. यात तिने बॉलिवूडच्या बड्या निर्मात्यांना बोल लावलेच पण त्या पलिकडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांचा उल्लेखही अवमानकारक केला. त्यानंतर वेळोवेळी कंगना बोलत राहिली. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचं सरकार आल्यानंतर त्याबद्दलची अनेक वक्तव्ये तिने ट्विटरवर केली. तिथे हिंसा होत असल्याचे अनेक व्हिडीओ शेअर केले. लोकशाही मानणाऱ्या भारतासारख्या देशात लोकशाहीचा प्रचंड आदर होतो. त्या पश्चिम बंगालच्या जनतेने केलेल्या मतदानाचा अवमान कंगनाने केल्यानंतर मात्र ट्विटरने तिचं अकाऊंट सस्पेंड केलं होतं.