मुंबई : बॉलिवूड किंवा क्रिकेटमधील मोठमोठी नावं आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न सर्वच अॅडमेकर्स करत असतात. मात्र एका जाहिरात निर्मात्या कंपनीच्या गळाला तीन मोठे सेलिब्रेटी लागले आहेत. राजकुमार हिरानी यांचं दिग्दर्शन असणाऱ्या अॅडफिल्ममध्ये कंगना राणावत, विराट कोहली
आणि कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी दिसण्याचे संकेत आहेत.


 
सध्या याबाबत गुप्तता पाळण्यात येत असली, तरी आयपीएल सुरु झाल्यानंतर ही जाहिरात टीव्हीवर येण्याची शक्यता आहे. मुंबईत 7 एप्रिलला या जाहिरातीचं चित्रीकरण होणार असल्याची माहिती आहे. यापूर्वीही कंगनाच्या एका जाहिरातीचं दिग्दर्शन करणारे, सुप्रसिद्ध फिल्ममेकर राजू हिरानींकडे या जाहिरातीची धुरा असेल.

 
आतापर्यंत विराट-अनुष्का, ख्रिस गेल-प्रियंका चोप्रा, धोनी-प्रिती झिंटा यासारख्या क्रिकेटर्स आणि फिल्मस्टार्सच्या जोड्या जाहिरातीत दिसल्या आहेत. मात्र क्रिकेटमधली दोन मोठी नावं आणि बॉलिवूडची टॉपवर असलेली अभिनेत्री पहिल्यांदाच एकत्र दिसतील.

 
कंगना राणावत सध्या विशाल भारद्वाज यांच्या एका चित्रपटाचं शूटिंग करत आहे. कंगना तिच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढणार असून दोघांसोबत काम करण्यास ती प्रचंड उत्सुक असल्याची माहिती आहे. तर टी 20 विश्वचषकानंतर धोनी आणि विराट मोकळ्या वेळाचा आनंद लुटत आहेत.