मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी देशात एक उत्तम फिल्म सिटी तयार करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यासंदर्भात कंगनाने योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी उकृष्ट फिल्म सिटी तयार करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठीच त्यांनी नोएडा, ग्रेटर नोएडा आणि यमुना एक्सप्रेस वे ही ठिकाणं फिल्म सिटी तयार करण्यासाठी उत्तम असल्याचं सांगितलं.

कंगना रनौतचं ट्वीट :



कंगना रनौतने ट्वीट केलं आहे की, 'लोकांचा असा समज आहे की, भारतात हिंदी फिल्म इंडस्ट्री सर्वात मोठी फिल्म इंडस्ट्री आहे. जो अत्यंत चुकीचा आहे. तेलगु फिल्म इंडस्ट्रीने सिद्ध केलं असून ती सध्या टॉपवर आहे. आणि तेलगु फिल्म इंडस्ट्रीमधील चित्रपट आता अनेक भाषांमध्ये रिलीज करण्यात येत आहेत. तसेच अनेक हिंदी चित्रपटांचं शुटींग हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये केलं जातं.'


कंगना रनौतने आणखी एक ट्वीट करत लिहिलं की, 'योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या घोषणेचं मी समर्थन करते. आम्हाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक रिफॉर्म्सची गरज असते. सर्वात आधी आपल्याला एका मोठ्या फिल्म इंडस्ट्रीची गरज आहे. जी भारतातील चित्रपट उद्योग म्हणून ओळखली जाईल. हॉलिवूडलाही याचा फायदा मिळू शकेल. एक इंडस्ट्री परंतु, अनेक फिल्म सिटी.'

काय म्हणाले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ?

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, 'देशात एका उत्तम फिल्म सिटीची गरज आहे. उत्तर प्रदेश ही जबाबदारी घेण्यासाठी तयार आहे. आम्ही एक उत्कृष्ट सिटी तयार करणार आहोत. फिल्म सिटीसाठी नोएडा, ग्रेटर नोएडा आणि यमुना एक्सप्रेसवे ही ठिकाणं उत्तम आहेत. ही फिल्म सिटी चित्रपट निर्मात्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरेल. तसेच रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीनेही उत्तम पर्याय असेल. यासाठी लवकरच योजना तयार करण्यात येईल.'