मुंबई : बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर झालेल्या हिंसाचारात काही जणांचे मृत्यू झाले. यावर वादग्रस्त अभिनेत्री कंगना रनौत हिने स्वत: च्या ट्विटर हँडलवरुन हिंसाचार करणाऱ्यांना हिंसाचारातून उत्तर द्यायला हवं असं धक्कादायक विधान केलं. हे विधान चिथावणीखोर आणि आक्षेपार्ह असल्याने ट्विटरने कंगनाचे ट्विटर हँडल निलंबित केले आहे. यावर आता कंगना रनौतने एबीपी न्यूजला तिची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
एबीपी न्यूजने ट्विटरवरून निलंबनाबद्दल कंगनाची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने लेखी निवेदनाद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कंगना रनौतने असे उत्तर दिले की, "ट्विटरने हे पुन्हा सिद्ध केलं की ते अमेरिकन आहेत आणि अमेरिकन लोक काळ्या (ब्राउन) लोकांना गुलाम बनवण्याच्या मानसिकतेने जन्माला आले आहेत. ते ठरवतात की आपण काय विचार करावा, काय बोलावे किंवा काय करावे. सुदैवाने माझ्याकडे आणखी काही प्लॅटफॉर्म आहेत, ज्याद्वारे मी आवाज उठवू शकते आणि माझ्या सिनेमाबद्दल बोलू शकते."
कंगना रनौत पुढे म्हणाली, की "माझं मन देशातील त्या लोकांसाठी दुःखी आहे, ज्या लोकांवर अत्याचार होतात आणि ते दडपले जातात, त्यांना गुलाम म्हणून ठेवले जाते आणि ज्यांची अभिव्यक्ती दाबून टाकील आहे. एवढे असूनही त्यांच्या दु: खाचा अंत नाही."
विशेष म्हणजे, यापूर्वीही कंगना रनौतने अशी वादग्रस्त विधाने केली आहेत. गेल्या वर्षीही तिच्या ट्विटर अकाउंटवरून विशिष्ट समुदायाला लक्ष्य केल्यामुळे अकाउंट निलंबित झाले होते.