Kantara : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील 'कांतारा' (Kantara)  हा चित्रपट मोठ्या पडद्यावर दररोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर सर्वजण ऋषभ शेट्टीच्या (Rishabh Shetty) अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि लेखनाचेही कौतुक करत आहेत. यामुळेच 'कांतारा' हा चित्रपट IMDb वर या वर्षातील सर्वाधिक रेटिंग मिळवणारा चित्रपट ठरला आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतनेही (Kangana Ranaut) ऋषभ शेट्टीच्या या चित्रपटाचे कौतुक केले आहे. तिने या चित्रपटाचे कौतुक करताना हा एक अप्रतिम चित्रपट असल्याचे म्हटले आहे.


कंगना रनौतने 'कांतारा' चित्रपट पाहिल्यानंतर इंस्टाग्रामवर लाईव्ह सेशन केले. यामध्ये तिने ऋषभ शेट्टीच्या चित्रपटाचे जोरदार कौतुक केले. अभिनेत्री म्हणाली, ‘मी आताच माझ्या कुटुंबासह कांतारा पाहून येत आहे आणि अजूनही थरथरत आहे. किती छान अनुभव होता तो... ऋषभ शेट्टी, तुला सलाम, लेखन, दिग्दर्शन, अभिनय सगळंच अविश्वसनीय! परंपरा, लोककथा, समस्या यांचा किती सुरेख मिलाफ आहे. इतकी सुंदर फोटोग्राफी, अॅक्शन... हा एक अप्रतिम चित्रपट आहे.’


कंगनाला आवडला कांतारा!


व्हिडीओमध्ये पुढे ती म्हणाली की, 'कांतारामध्ये आपली परंपरा, लोककथा किती छान प्रकारे दाखवल्या आहेत. या चित्रपटातून बाहेर पडायला मला अजून आठवडातरी लागेल. संपूर्ण चित्रपट अप्रतिम आहे. आम्ही असा चित्रपट यापूर्वी कधीच पाहिला नाही, असे म्हणत लोक थिएटरमधून बाहेर पडत होते. या चित्रपटासाठी ऋषभ शेट्टीचे खूप खूप आभार.’ व्हिडीओमध्ये कंगनाही खूप भावूक झालेली दिसली, तिचे हावभाव पाहून असे वाटले की, तिला ‘कांतारा’ चित्रपट खूप आवडला आहे.



हिंदी व्हर्जनलाही मिळतेय जोरदार पसंती


अवघ्या 16 कोटींमध्ये बनलेला ‘कांतारा’ हा चित्रपट सध्या साऊथच नव्हे तर, हिंदीमध्येही धुमाकूळ घालत आहे. ‘कांतारा’ हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी हिंदीमध्येही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने हिंदीतही 11कोटींहून अधिकची कमाई केली आहे. आधी हा चित्रपट फक्त कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता, पण नंतर चित्रपटाला मिळालेले अफाट यश पाहून निर्मात्यांनी तमिळ, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्येही त्याचे डबिंग केले. इतर भाषांमध्ये रिलीज झाल्यानंतर ‘कांतारा’च्या कमाईत वाढ झाली आहे. चित्रपटाची कन्नड आवृत्ती ब्लॉकबस्टर ठरली आणि आता इतर भाषांमध्येही या चित्रपटाने आपली चुणूक दाखवली आहे.


'कांतारा' हा चित्रपट एक अॅक्शन थ्रिलर आहे, ज्यामध्ये ऋषभ शेट्टीने लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय केला आहे. 30सप्टेंबर रोजी रिलीज झाल्यापासून,  या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 170 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 'कांतारा'मध्ये अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी आणि किशोर सहाय्यक भूमिकेत दिसले आहेत.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: