नुकतंच न्यूयॉर्कमध्ये एका अवॉर्ड शोमध्ये करण जोहर, वरुण धवन आणि सैफ अली खान यांनी 'नेपोटिझम रॉक्स' अर्थात 'कंपूशाहीचा विजय असो' अशी घोषणाबाजी केली. 'कंगना यावर काही बोलली नाही, तरच बरं आहे. कंगना फारच बोलते' असं करण जोहर यावेळी म्हणाला. हा वाद सोशल मीडियावर जाताच वरुण आणि करणने सपशेल माफी मागितली. सैफ अली खानने मात्र कंपूशाहीवर एक खुलं पत्र लिहित कंगनाची माफी मागत असल्याचं म्हटलं.
कंगनाने सैफच्या पत्राला उत्तर दिलं आहे. 'मी आयुष्याचा मोठा काळ जेनेटिक्स या विषयाचा अभ्यास करण्यात घालवला आहे. मात्र तू अनुवंशिकरित्या तयार झालेल्या घोड्याची तुलना एका कलाकाराशी कशी काय करु शकतोस?' असा सवाल कंगनाने केला आहे.
'कलाकारांचं कौशल्य, कठोर मेहनत, अनुभव, एकाग्रता, उत्साह, तत्परता, शिस्त आणि प्रेम या सगळ्या गोष्टी कुटुंबाच्या गुणसूत्रांतून वारसा हक्काने मिळू शकतात का? तुमचा हा तर्क खरा मानला, तर मी माझ्या घरी एक शेतकरी म्हणून काम करत असते.' असं कंगना म्हणते.
कंगनाने बॉलिवूड सोडण्याचा विचार करावा : करण जोहर
'सैफ तू तुझ्या पत्रात म्हटलं आहेस की मी कंगनाची माफी मागितली आहे. मी अन्य कोणालाही उत्तर द्यायला बांधील नाही, त्यामुळे हा विषय इथेच संपला आहे. मात्र हा विषय फक्त माझ्यापुरता मर्यादित नाही.' असंही कंगनाने पुढे लिहिलं आहे.
स्वामी विवेकानंद, अल्बर्ट आईनस्टाईन, विल्यम शेक्सपिअर यासारख्या व्यक्तींची उदाहरणं देऊन कंगनाने आपला कोणाशीही वाद नसल्याचं पत्रात स्पष्ट केलं.