मुंबई : आतापर्यंत 'मीटू'चं वादळ हे महिलांनी पुरुषांविरोधात केलेले लैंगिक अत्याचार, गैरवर्तनाचे आरोप यांच्यामुळे गाजत आहे. मात्र पहिल्यांदाच एका महिलेने चक्क दुसऱ्या महिलेविरोधात विनयभंगाचा आरोप केला आहे. प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कनीज सुरकाने स्टँडअप कॉमेडियन अदिती मित्तलने विनयभंग केल्याचा दावा केला. त्यानंतर अदितीने माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.


मुंबईतील अंधेरीमध्ये 2016 साली एका जाहीर कार्यक्रमात हा प्रकार घडल्याचा आरोप कनीजने ट्विटरवर केला. शेकडो प्रेक्षक आणि प्रसिद्ध विनोदवीरांच्या उपस्थितीत एक विनोदी कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी अदिती अचानक मंचावर आली. परवानगीविना माझ्या तोंडात जीभ टाकून तिने बळजबरीने आपलं चुंबन घेतलं, असा दावा कनीजने केला.

'गेल्या वर्षी मी तिला याबाबत टोकलंही, आधी तिने माझी माफी मागितली, मात्र नंतर मला दुखावलं' असंही कनीज म्हणाली. मात्र अदिती मित्तलने कनीजची माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तो निव्वळ विनोद होता, असं सांगत अदितीने क्षमा मागितली.




#MeToo चं वादळ

ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांनी 20 वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचा गंभीर आरोप 'तारा' मालिकेच्या लेखिका-दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केला होता. विनिता नंदा यांनी फेसबुक पोस्ट लिहून अत्याचाराला वाचा फोडली. #MeToo या चळवळीअंतर्गत देशभरातील विविध क्षेत्रातल्या महिलांनी आपल्यावर झालेले लैंगिक अत्याचार, गैरवर्तन यांच्याविषयी आवाज उठवायला सुरुवात केली आहे.

अभिनेत्री तनुश्री दत्ता, कंगना रनौत, सोना मोहापात्रा, पूजा भट्ट, फ्लोरा सैनी, ज्वाला गुट्टा यांनीही आपली आपबिती मीडियासमोर सांगितली होती. दिग्गज अभिनेते नाना पाटेकर, संस्कारी बाबूजी अलोकनाथ, गायक कैलाश खेर यांच्यापासून दिग्दर्शक विकास बहल, लेखक चेतन भगत, अभिनेता रजत कपूर अशा अनेक जणांवर आरोप झाले आहेत.

#MeToo चं वादळ त्यानंतर नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातही दाखल झालं. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यमंत्री एम जे अकबर यांच्यावर पत्रकार प्रिया रमानी यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.