कमल हसन आणि रजनीकांत यांची भेट, तामिळनाडूत चर्चांना उधाण
एबीपी माझा वेब टीम | 18 Feb 2018 10:56 PM (IST)
ही भेट राजकीय नव्हती, अशी माहिती कमल हसन यांनी दिली.
चेन्नई : लवकरच राजकीय पक्षाची घोषणा करणार असलेले ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी सुपरस्टार रजनीकांत यांची भेट घेतली. या भेटीनंतर तामिळनाडूतील राजकारणात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. चेन्नईत रजनीकांत यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. दरम्यान, ही भेट राजकीय नव्हती, अशी माहिती कमल हसन यांनी दिली. भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कमल हसन बुधवारी तामिळनाडूतील रामेश्वरम येथून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात करणार आहेत. आपण जीवनातील एक महत्त्वाचा प्रवास सुरु करत आहोत आणि हा प्रवास सुरु करण्यापूर्वी काही ठराविक लोकांशी भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या राजकारणाचा रंग ‘काळा’ आहे, जो द्रविड दर्शवतो, असं कमल हसन यांनी म्हटलं होतं. शिवाय आपली युती रजनीकांत यांच्या पक्षाशी होऊ शकते, मात्र रजनीकांत यांच्या राजकारणाचा रंग भगवा, असेल तर आपण त्यांच्यापासून दूर राहू, असं ते म्हणाले होते.