कल्याण : मनसेच्या दणक्याने सिनेमॅक्स प्रशासन ताळ्यावर आलं. 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाचे उद्यापासून चार शो सिनेमॅक्स मल्टिप्लेक्समध्ये दाखवण्यात येणार आहेत. शो आणखी वाढवण्याबाबत मनसेला लेखी आश्वासन देण्यात येणार आहे.


'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' या मराठी चित्रपटाला प्राईम टाईम शो न दिल्यास 'खळ्ळ खट्यॅक' करण्याचा इशारा मनसेने 'सिनेमॅक्स'ला दिला होता. या चित्रपटाचा दिवसभरात एकच शो होत असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली होती.

मनसे कार्यकर्ते मल्टिप्लेक्समध्ये दाखल झाल्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. मल्टिप्लेक्स चालकांना दुपारपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला होता, मात्र त्यापूर्वीच सिनेमॅक्सने 'घाणेकर'चे खेळ वाढवले

मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार अर्थात हरहुन्नरी अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर आधारित 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' हा चित्रपट पाडव्याच्या मुहुर्तावर म्हणजेच 8 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. राज्याच्या विविध भागात हा सिनेमा प्रेक्षकांची गर्दी खेचत आहे. कल्याण भागात अनेक मराठी भाषिक राहतात. मात्र सिनेमॅक्स चित्रपटगृहात केवळ दुपारी तीन वाजता या सिनेमाचा शो होता.

दुसरीकडे, आमिर खान-अमिताभ बच्चन यांच्या 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' चित्रपटाचे दिवसातून आठ खेळ होतात. आधीच दिवाळीचे दिवस, त्यात मराठमोळ्या सिनेमाला अडनिडी वेळ दिल्यामुळे प्रेक्षकांची गैरसोय होत असल्याचा दावा मनसेने केला.

प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे या चित्रपटात डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारत आहे. त्याशिवाय आनंद इंगळे, सोनाली कुलकर्णी, सुमीत राघवन, मोहन जोशी, प्रसाद ओक या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. अभिजीत शिरीष देशपांडे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे.