मुंबई : प्रेक्षक आणि समीक्षकांनी धू-धू धुतलेला 'कलंक' चित्रपट बॉक्स ऑफिसवर मात्र 'धो-धो' चालताना दिसत आहे. कलंक हा 2019 मधील सर्वाधिक ओपनिंग (पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई) मिळवणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपट ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.


कलंकने पहिल्या दिवशी (बुधवार 17 एप्रिल 2019) 21.60 कोटी रुपयांची कमाई केली. आतापर्यंत अक्षय कुमारचा 'केसरी' हा चित्रपट 2019 मधील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा सिनेमा होता. मात्र प्रेक्षकांनी अभिमानाचा टिळा लावल्यामुळे 'कलंक'ने 'केसरी'ला मागे टाकलं.

करण जोहरच्या 'कलंक' चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट, वरुण धवन आणि आदित्य रॉय कपूर यासारखे सहा तगडे कलाकार असल्यामुळे साहजिकच सिनेमाकडे प्रेक्षकांचा ओढा होता. त्यामुळेच बुधवारी प्रदर्शित होऊनही 'कलंक'ने पहिल्याच दिवशी बक्कळ गल्ला जमवला.



कलंक चित्रपट पाहिल्यानंतर मात्र प्रेक्षकांची चांगलीच निराशा झाली आहे. अनेक जणांनी सोशल मीडियावर 'कलंक'विषयी निगेटिव्ह रिव्ह्यू लिहिले आहेत. 'एबीपी माझा'च्या रिव्ह्यूमध्येही कलंक चित्रपट समाधानकारक नसल्याचं म्हटलं आहे.
REVIEW | कलंक आहे नुसता!!

मल्टिस्टार, चित्रपटाविषयी निर्माण केलेलं कुतूहल (किंबहुना हाईप), चार हजार स्क्रीन्स आणि महावीर जयंतीची सुट्टी या कारणांमुळे 'कलंक'ने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केल्याचा अंदाज तरण आदर्श यांनी व्यक्त केला आहे.




विशेष म्हणजे 2019 मध्ये सर्वाधिक ओपनिंग मिळवणारे टॉप तीन चित्रपट हे शुक्रवारखेरीज इतर वारी (मात्र सुट्टीच्या दिवशी) प्रदर्शित झालेले आहेत.

2019 मधील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारे चित्रपट
1. कलंक-  21.60 कोटी (बुध)
2. केसरी-  21.06 कोटी (गुरु)
3. गली बॉय- 19.40 कोटी (गुरु)
4. टोटल धमाल- 16.50 कोटी


'कलंक'हा वरुण आणि आलिया यांचा स्वतंत्रपणेही सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा सिनेमा ठरला आहे. आतापर्यंत आलियाचे राझी, बद्रिनाथ की दुल्हनिया, टू स्टेट्स, हम्प्टी शर्मा की दुल्हनिया, उडता पंजाब, हायवे यासारखे सोलो हिट ठरले होते, मात्र तरीही 'कलंक' इतकी ओपनिंग या सिनेमांना मिळालं नव्हतं. वरुणचेही दिलवाले, जुडवा 2, बद्रिनाथ की दुल्हनिया, एबीसीडी 2 यासारखे सिनेमे बॉक्स ऑफिसवर तूफान चालले होते.