मोलकरणीचा पगार थकवून धमकी, अभिनेत्री किम शर्माविरोधात गुन्हा
एबीपी माझा वेब टीम | 19 Apr 2019 09:00 AM (IST)
मोलकरणीचा पगार थकवून तिला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबईतील खार पोलिस ठाण्यात अभिनेत्री किम शर्माविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फोटो सौजन्य : किम शर्मा
मुंबई : बॉलिवूडमधील कोणे एके काळची अभिनेत्री किम शर्माविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महिन्याभराचा पगार थकवून खोट्या आरोपात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप किमच्या मोलकरणीने केला आहे. मुंबईतील खार पोलिस ठाण्यात किम शर्माविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार नम्रता सोळंकी किमकडे घरकाम करत होती. मात्र तिचा गेल्या महिन्याभराचा पगार किमने दिला नव्हता. नम्रताने किमकडे पगाराची मागणी केली, तेव्हा तिला पूर्ण दिवसभर थांब आणि पगार घेऊन जा, अशी अट घालण्यात आली. नम्रताने दुसऱ्या दिवशी पुन्हा किमकडे पगार मागितला असता, 'पोलिसांकडे तुझी तक्रार करत तुला खोट्या प्रकरणात अडकवेन' अशा शब्दात किमने धमकावल्याचा दावा मोलकरीण नम्रताने केला आहे. या प्रकरणी नम्रताने खार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली. किम शर्माविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.