मुंबई : सोशल मीडियाच्या रुपाने नेटिझन्सच्या हाती टीका करण्याचं आयतं कोलीत सापडलं आहे. विविध क्षेत्रांतील सेलिब्रिटींना ट्रोल करण्याची एकही संधी टवाळखोर सोडत नाहीत. यावेळी ट्रोलर्सच्या तावडीत सापडली आहे ती बॉलिवूड अभिनेता अजय देवगन आणि अभिनेत्री काजोल यांची कन्या न्यासा.

गोरा रंग आणि सौंदर्याच्या भ्रष्ट संकल्पनांतून समाज कधी बाहेर येणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. न्यासाला यावेळी ऑनलाईन वर्णभेदी टिप्पण्यांना सामोरं जावं लागलं. मुंबई विमानतळाबाहेरचा काजोल-न्यासाचा एक फोटो काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला होता. या फोटोवर निर्लज्ज यूझर्सनी कमेंट केल्या आहेत.

कोणी न्यासाच्या रंगावरुन भाष्य केलं, तर कोणी तिला प्लॅस्टिक सर्जरी करण्याचा अगोचर सल्ला दिला. ज्याप्रमाणे काजोलने स्वतःचा वर्ण उजळला, त्याप्रमाणे तिने आपल्या लेकीलाही मार्गदर्शन करावं, असंही कोणी सुचवलं.

आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी फेअरनेस क्रीमच्या जाहिराती न करण्याचा निर्णय घेतला आहे. कंगना, बिपाशा बसू, नंदिता दास यासारख्या अनेक जणींनी याविरोधात आवाज उठवला आहे. मात्र याबाबत जनसामान्यांमध्ये जागृती कधी होणार, याबाबत प्रश्नच आहे.