मुंबई : रणवीर सिंह सध्या त्याच्या आगामी 'गली बॉय' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रणवीर नेहमीच उत्साहात असतो. मात्र रणवीरच्या या अतिउत्साहाचा फटका त्याच्या चाहत्यांना बसला आहे.


काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात स्टेजवर रॅप साँग गात असताना रणवीरने अचानक स्टेजवरुन खाली उभ्या असलेल्या चाहत्यांच्या अंगावार उडी मारली. या उडीमुळे काही चाहते जखमी झाले आहेत. या घटनेनंतर एकाने रणवीरचा फोटो ट्विटर शेअर करत म्हटलं की, "रणवीर सिंह तू आता मोठ्यांसारखं वागायला पाहिजे, तुझा बालिशपणा सोडायला हवा."





ट्विटरवर शेअर केलेल्या एका फोटोमध्ये रणवीर सिंह चाहत्यांवर उडी मारत असल्याचं दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत एक तरुणी डोक्याला हात लावून बसल्याचं दिसत आहे. या तरुणीच्या डोक्याला मार लागल्याचं यातून दिसून येत आहे.





गली बॉयच्या प्रमोशनदरम्यान ही पहिली वेळ नाही की रणवीरने स्टेजवरुन चाहत्यांवर उडी मारली आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ आहेत, ज्यामध्ये रणवीर चाहत्यांवर उडी मारताना दिसत आहे.


रणवीर ज्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी हा सगळा खटाटोप करतोय, तो गली बॉय सिनेमा येत्या 14 फेब्रुवारीला रिलीज होत आहे. या सिनेमात रणवीर सिंहसोबत आलिया भटही दिसणार आहे. जोया अख्तरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.