Kailash Waghmare Varun Grover : अनेकदा आपल्या आवडत्या कलाकारांसोबत एक फोटो, सेल्फी काढून ती आठवण सोबत ठेवण्याचा प्रयत्न चाहते करतात. मात्र, ज्याचे तुम्ही फॅन असता, तीच व्यक्ती फोटोसाठी आग्रह धरते तेव्हा तुम्हाला आकाश ठेंगणे होते. असाच अनुभव मराठी अभिनेता कैलास वाघमारेला (Kailas Waghmare) आला. पृथ्वी थिएटरमधील प्रयोग संपल्यानंतर कैलास वाघमारे ज्याचा चाहता त्यानेच स्वत:हून त्याचे कौतुक करत त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी आग्रह धरला. कैलास वाघमारेने हा किस्सा शेअर केला आहे.
कैलास वाघमारे हा सध्या चित्रपटांशिवाय रंगभूमीवरही काम करत आहे. त्याचे 'सेम सेम बट डिफरेंट' (SAME, SAME, BUT DIFFERENT) हे नाटक रंगभूमीवर असून त्याचे प्रयोग सुरू आहेत. नुकत्याच या नाटकाचा पृथ्वी थिएटरमध्ये हाऊसफुल प्रयोग झाला. यावेळी लेखक वरुण ग्रोव्हर (Varun Grover) हा देखील कुटुंबासोबत हजर होता. यावेळी त्याला 'सेम सेम बट डिफरेंट'चा प्रयोग भावला. प्रयोग संपल्यानंतर वरूणने कैलासची भेट घेत कौतुक केले. कैलास या भेटीबाबत सांगितले की, वरुण ग्रोव्हरचा मी मोठा चाहता आहे. मोजकी लेखक आहेत जे मातीमधलं लिहितात.वरुणने प्रयोग संपल्यानंतर जवळपास अर्धा तास गप्पा मारत नाटक आवडल्याचे सांगितले. यावेळी त्याने आपल्या कुटुंबीयांशी ओळख करून दिली. माझ्यासाठी हा आठवणीतील क्षण असल्याचे कैलासने म्हटले. कैलासने या खास भेटीची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
'सेम सेम बट डिफरेंट' या नाटकात कैलास वाघमारे आणि जान्हवी श्रीमानकर यांची भूमिका आहे. सपन सरन यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. हे नाटक काल्पनिक रेखाटनांद्वारे, समान, समान परंतु भिन्न दोन गायकांच्या वैयक्तिक प्रवासाबद्दल आहे. या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हुमा कुरेशी आणि चंकी पांडेसोबत झळकणार कैलास
'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकातून कैलास वाघमारे चर्चेत आला. 'मनातल्या उन्हात' या चित्रपटातून सिनेसृष्टीत नायक म्हणून पदार्पण केले. हाफ टिकीट, भिकारी आदी चित्रपटातील त्याच्या भूमिका लक्षात राहिल्या. तानाजी-द अनसंग वॉरियर, भोंसले आदी चित्रपटातही भूमिका साकारल्या आहेत. सध्या कैलास हा अभिनेत्री हुमा कुरेशी आणि चंकी पांडे सोबत काम करत आहे. तर, विविध चित्रपट महोत्सवात गौरवण्यात आलेला 'गाभ'चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे.