मुंबई : काबुल एक्स्प्रेस, एक था टायगर, फँटम, बजरंगी भाईजान यांसारख्या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन केलेल्या कबीर खान आता नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी ‘ट्युबलाईट’चं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर कबीर खान वेब सीरीजच्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं नशीब आजमावणार आहे.


अमेझॉन प्राईमसाठी एका वेब सीरीजचं दिग्दर्शन कबीर खान करणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर आधारित असलेली ही वेब सीरीज जगभरात आठ भागांमध्ये प्रदर्शित केली जाईल.

दिग्दर्शक कबीर खानच्या वेब सीरीजचा विषयही वेगळा आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेची सुरुवात, त्यातील महिलांचं योगदान आणि आझाद हिंद सेनेशी संबंधित कधीही समोर न आलेल्या मुद्द्यांवर कबीर वेब सीरीजमधून प्रकाश टाकणार आहे.

‘द फॉरगॉटन हिरोज’ असे या वेब सीरीजला सध्या नाव देण्यात आले आहे. यावर काम सुरु केल्यानंतर नावात बदलही केलं जाऊ शकतं. ‘ट्युबलाईट’च्या रिलीजनंतर या वेब सीरीजच्या शूटिंगला सुरुवात केली जाणार आहे.