मुंबई: कॅनडाचा प्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बिबरची नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडिअमवर भारतातली पहिली लाईव्ह कॉन्सर्ट झाली. या कॉन्सर्टमध्ये त्याने स्वत: गाणी न गाता, केवळ लिप सिंक केल्याचा आरोप होत आहे.
असं असलं तरी दुसरीकडे जस्टिन बिबरच्या या कॉन्सर्टमुळे महाराष्ट्र सरकारला जवळपास 3 कोटी 40 लाख रुपये मिळाले आहेत. हिंदुस्थान टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
बिबरच्या कार्यक्रमावरील विविध टॅक्समुळे महाराष्ट्र सरकारला ही रक्कम मिळाली आहे. दिल्लीतील व्हाईट फॉक्स कंपनीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
या कार्यक्रमासाठी अॅडव्हान्स टॅक्स म्हणून 3 कोटी 7 लाख रुपये जमा करुन घेतले होते. त्यावेळी 35 हजार लोक या कार्यक्रमाला उपस्थिती लावतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यापेक्षा जास्त लोक आल्याने आयोजकांना आणखी 33 लाख भरावे लागतील, असं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितलं.
नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी एचटीला दिलेल्या माहितीनुसार, बिबरच्या कॉन्सर्टसाठी देश-विदेशातून 40 हजार लोक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलिसांनी 15 लाख रुपये अॅडव्हान्सरुपी घेतले होते.
सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यासाठी आम्ही कॉन्स्टेबलसाठी प्रत्येकी 2 हजार रुपये तर अधिकाऱ्यासाठी 2500 रुपये आकारले होते, असं उपायुक्त तुषार दोषी यांनी एचटीला सांगितलं.
"30 अधिकाऱ्यांसह जवळपास 700 पोलीस या कॉन्सर्टसाठी तैनात होते. अजून आम्ही हिशेब केलेला नाही, तो करुन आयोजकांना बिल पाठवून देऊ. एकदा कार्यक्रम झाल्यानंतर पैसे वसूल करणं मोठं जिकीरीचं काम असतं. त्यामुळेच आम्ही अॅडव्हान्स रक्कम घेतो", असंही त्यांनी सांगितलं.