हिट अँड रन: ‘अभिनेत्री भाग्यश्रीच कार चालवत होती’, पोलिसांचा दावा
एबीपी माझा वेब टीम | 13 May 2017 10:06 AM (IST)
मुंबई: अभिनेत्री भाग्यश्री हिट अँण्ड रन प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे. कारण मागील वर्षी सांताक्रुझ परिसरात झालेल्या अपघातात स्वत: भाग्यश्रीच गाडी चालवत असल्याचं पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटलं आहे. हा अपघात घडला तेव्हा गाडी भाग्यश्रीचा ड्रायव्हर चालवत होता असा दावा दासानी दाम्पत्याकडून केला जात होता. मात्र, पोलिसांच्या म्हणण्यानुसार भाग्यश्री हिच कार चालवत होती आणि अपघात घडल्यानंतर ती घटनास्थळावरुन पसार झाली. सांताक्रुझ पश्चिममधल्या व्होडाफोन गॅलरीसमोरच्या सिग्नलवर थांबलेल्या युवकाला भाग्यश्रीच्या स्कोडा गाडीनं जोरदार धडक दिली होती. यामध्ये त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर पोलिसांनी भाग्यश्रीविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली होती.