Juna Furniture : काय अपेक्षा आहेत आमच्या अशा त्यांच्याकडून… दिवसातून एकदा आमच्या खांद्यावरून हात फिरवून विचार ना.. आई कशी आहेस? बाबा कसे आहात? मन सुन्न करणारे हे वाक्य नकळत डोळ्यांच्या कडा पाणावणारे आहे. आपल्याकडे अनेकदा वयस्कर व्यक्तींना आऊटडेटेड, अडगळीतले सामान असे म्हटले जाते. परंतु याच सामानाची किंमत आणि ताकद काय आहे, हे सांगणारा चित्रपट येत्या 26 एप्रिल 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. सिनेमाचं नाव जरी 'जुनं फर्निचर' (Juna Furniture) असलं तरी हा चित्रपट आपल्याला खूप काही नवं देऊन जाणारा आहे. 26 एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या निमित्ताने महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar), मेधा मांजरेकर (Medha Manjrekar), भूषण प्रधान (Bhushan Pradhan), अनुषा दांडेकर (Anusha Dandekar) यांनी एबीपी माझाच्या स्टुडिओमध्ये येत मनमोकळ्या गप्पा मारत मुलाखत दिली.


'जुनं फर्निचर'मध्ये प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार?


जे वास्तव प्रत्येकाला दिसतं, पण कोणी त्याबाबत बोलायची तसदी घेत नाही, अशा विषयांमध्ये महेश मांजरेकर नेहमी हात घालत असतात. अशाच  सिनेमाची पुन्हा एकदा मेजवानी महेश मांजरेकर घेऊन आलेत. हा सिनेमा आहे सजीव व्यक्तींवर पण या सिनेमाचं नाव निर्जीव वस्तूवर का ? यामागचं गुपित उलगडताना महेश मांजरेकर म्हणाले, "मित्रांमध्ये बसायचो तेव्हा कधी वडिल आले की मित्र पटकन म्हणून जायचे, तुझं 'जुनं फर्निचर' आलं बघ, माझे वडील तर खूप कडक स्वभावाचे होते तर त्यांना तर माझे मित्र 'हिटलर' म्हणायचे, म्हणून सिनेमाचं नाव 'जुनं फर्निचर' असं ठेवायचं सुचलं". 


मांजरेकर पुढे म्हणाले,"जुनं फर्निचर' हा सिनेमा नातेसंबंधांवर भाष्य करणारा आहे. हा सिनेमा अशा लोकांवर नाही, जे आई वडिलांना वाईट वागवतात, हा सिनेमा आहे जे आई-वडिलांना गृहित धरतात, मी लोकांना नाव ठेवत नाही कारण हे मीही केलं आहे"
 
'जुनं फर्निचर' या चित्रपटात मुलाची भूमिका साकारणाऱ्या भूषण प्रधानला या पिढीचा प्रतिनिधी म्हणून काय वाटतं असं विचारलं, तेव्हा तो म्हणतो "आज आपण जेव्हा 'जुनं फर्निचर' असं म्हणतो तेव्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आज जरी आपण नवं फर्निचर असलो तर काही काळानंतर आपणही जुनं फर्निचर होणार आहोत, आणि पुढच्या पिढीला हे दाखवणं गरजेचं आहे की आपण आपल्या आई-वडिलांची काळजी कशी घेतली पाहिजे." अनुशा दांडेकर म्हणते " माझी भूमिकाही स्वतंत्र स्त्रीची आहे, जी सुनेच्या भूमिकेत जरी असली तरी तिचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा वेगळा आहे"


आपल्या पोटच्या मुलाला कोर्टात खेचणाऱ्या बापाची ही गोष्ट आहे, ज्या मुलावर आईच्या मृत्यूनंतर हत्येचा आरोप त्याचे वडील करतात, आता यापुढे काय होणार आहे, हे सिनेमा पाहिल्यानंतरच उलघडेल. 'जुनं फर्निचर' या चित्रपटाचा हिंदी रिमेक 10 मे 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश मांजरेकरांनी एबीपी माझाच्या मुलाखतीत याबद्दल घोषणा केली आहे.



संबंधित बातम्या


April 2024 Marathi Movie Release : एप्रिल महिन्यात मराठी चित्रपटांची 'रणधुमाळी'; संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटीलसह 'हे' चित्रपट रिलीज होणार