Jr NTR : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानमध्ये (Japan) भूकंपाचा धक्का आला आहे. जपानमध्ये भूकंपाचा धक्का आला त्यावेळी दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर (Jr NTR) तिथेच होता. अभिनेता आता सुखरुप भारतात परतला असून ट्वीट करत त्याने यासंदर्भात माहिती दिली आहे.


ज्युनियर एनटीआर सध्या 'आरआरआर' (RRR) या सिनेमामुळे चर्चेत आहे. गेल्या आठवड्यात तो आपल्या कुटुंबियांसोबत जपानला गेला होता. दरम्यान जपानमध्ये भूकंपाचा धक्का आल्याने अभिनेत्याला पुन्हा भारतात यावं लागलं आहे. अभिनेत्याने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.


ज्युनियर एनटीआरने ट्वीट करत दिली माहिती


भारतात परतल्यानंतर ज्युनियर एनटीआरने ट्वीट केलं आहे. त्याने ट्वीट केलं आहे,"जपानहून आज भारतात घरी परतलो आहे. तिथे आलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे मलादेखील धक्का बसला आहे. आठवडाभर मी जपानमध्ये होतो. या भूकंपाचा धक्का बसलेल्या प्रत्येकासाठी मला वाईट वाटत आहे. लवकरच सर्व काही ठिक होईल. स्टे स्ट्राँग, जपान". ज्युनियर एनटीआर नेहमीच त्याच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवताना दिसतो. अनेकदा तो देशाबाहेर जातो. नववर्षाच्या स्वागतासाठी तो पत्नी, लक्ष्मी प्रणती आणि अभय, भार्गव या दोन मुलांसह जपानला गेला होता. 






जपानसाठी नववर्षाची सुरुवात भूकंपाच्या झटक्यांनी झाली. जपानमध्ये 1 जानेवारी 2024 रोजी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. यामुळे प्रचंड नुकसान झालं असून त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भुकंपाच्या झटक्यांनंतर रस्ते व घरांची दूरवस्था झाली असून हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास जपान सरकारने सांगितलं आहे. आतापर्यंत आठ जणांचा भूकंपामुळे मृत्यू झाला आहे. याचदरम्यान, दाक्षिणात्य स्टार ज्युनिअर एनटीआर जपानमध्ये अडकला होता. 


ज्युनियर एनटीआरच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (JR NTR Movies)


ज्युनियर एनटीआर सध्या 'देवरा' (Devara) या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. कोराटाला शिवाने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. दोन भागांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. येत्या 8 जानेवारीला या सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'देवरा'चा पहिला भाग 5 एप्रिल 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ज्युनियर एनटीआरसह जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) मुख्य भूमिकेत आहेत.


संबंधित बातम्या


Earthquake in North Central Japan : नव्या वर्षाचे स्वागत सुरु असतानाच जपान शक्तीशाली भूकंपाने हादरला; पश्चिम समुद्र किनाऱ्यावर त्सुनामी