मुंबई : गुटखा आणि पान मसाला यासारख्या गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक आहे, पण याची जाहिरात सर्रास होते आणि काही दिग्गज बॉलिवूड कलाकार या जाहिरातीत झळकल्याचं पाहायला मिळतात. बॉलिवूडमध्ये पान मसाला आणि गुटख्याची जाहिरात करणाऱ्या कलाकारांवर अभिनेता जॉन अब्राहम भडकला आहे. व्यसनाधीन पदार्थांचे समर्थन करणाऱ्या जाहिरातींमध्ये अनेक कलाकार असून त्यावरुन केल्या काही महिन्यांपासून वाद सुरु आहे. त्यांच्यापैकी काही कलाकारांनी लोकांच्या दबावामुळे पान मसाला ब्रॅण्डपासून स्वतःला दूर केलं आहे. अजय देवगण, अक्षय कुमार आणि शाहरुख खान हे पान मसाला आणि गुटखा ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये दिसणारे दिग्गज कलाकार आहेत.
पान मसाल्याची जाहिरात करणाऱ्यांवर भडकला जॉन
रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टवर जॉन अब्राहमने यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. पॉडकास्टमध्ये जॉन अब्राहम म्हणाला की, एकीकडे आरोग्य आणि फिटनेस आणि दुसरीकडे पान मसाला यांना प्रोत्साहन देणे, असं करणाऱ्या अभिनेत्यांचा त्याला आदर नाही. जॉन म्हणाला की, 'मी कधीही मृत्यू विकू शकत नाही', त्याला त्याच्या चाहत्यांसाठी 'रोल मॉडेल' बनायचं आहे आणि त्याने केलेल्या उपदेशाचं तोच पालन करत नसेल तर त्यात अप्रामाणिकपणा स्पष्ट दिसून येईल.
'मी कधीही मृत्यू विकू शकत नाही'
जॉन पुढे म्हणाला की, 'मी जर माझं जीवन प्रामाणिकपणे जगलो आणि लोकांना मी जे सांगतो, तसं वागून मी एक आदर्श निर्माण करायला हवा. पण जर मी स्वत:ची बनावट आवृत्ती लोकांसमोर मांडत असेल आणि त्यांच्या पाठीमागे वेगळा माणूस असल्याचं भासवत असेल तर जनता ते सहज ओळखेल.
पान मसाल्याचा प्रचार करणाऱ्यांवर ताशेरे ओढले
जॉन अब्राहमने पुढे सांगितलं की, 'लोक फिटनेसबद्दल बोलतात आणि तेच लोक पान मसाल्याचा प्रचार करतात. मी माझ्या सर्व कलाकार मित्रांवर प्रेम करतो आणि मी त्यांच्यापैकी कोणाचाही अनादर करत नाही. मला हे स्पष्ट करायचे आहे की मी माझ्याबद्दल बोलत आहे. पण मी मृत्यू विकणार नाही, कारण ती तत्त्वाची बाब आहे. तुम्हाला माहिती आहे का की पान मसाला उद्योगाची वार्षिक उलाढाल 45 हजार कोटी रुपये आहे? याचा अर्थ सरकारही त्याला पाठीशी घालत आहे, आणि त्यामुळे ते बेकायदेशीर नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :