Jayant Sawarkar: ज्येष्ठ अभिनेते  जयंत सावरकर (Jayant Sawarkar) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.  वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.  शंभराहून अधिक मराठी नाटकांमध्ये आणि 30 हून अधिक हिंदी सिनेमांत त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या आहेत. जयंत सावरकर यांच्या निधनानंतर मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेते जयवंत वाडकर (Jaywant Wadkar) आणि प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी जयंत सावरकर यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. 


जयवंत वाडकर यांनी एबीपी माझासोबत बोलताना  जयंत सावरकर यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.  जयंत सावरकर यांच्यासोबत काम करताना आलेला अनुभव देखील जयवंत वाडकर यांनी सांगितला. ते म्हणाले,  'त्यांनी मला नाटक इंडस्ट्रीत आणले. आम्ही ऊन पाऊस नावाची एक एकांकीका केली होती. ती स्पर्धेत पहिली आली होती. त्यानंतर त्यांनी मला साहित्य संघात आणलं. बेबंदशाही या नाटकामध्ये त्यांनी मला घेतलं. त्यामध्ये मी खलनायकाची भूमिका साकारली होती. मी त्यांच्याबरोबरच अनेक नाटकांमध्ये काम केलं. इतका हरहुन्नरी नट मिळणं कठीण आहे. टिळक आणि आगरकर हे नाटक मला त्यांच्यामुळेच मिळाली.'


अभिनेता प्रशांत दामले म्हणाले, '1987 मध्ये संगीत संशय कल्लोळ या नाटकामध्ये मी काम करत होतो. त्या नाटकासाठी त्यांनी मला खूप मदत केली होती. त्यांच्यामध्ये निगेटिव्हिटी मला कधीच दिसली नाही. ते व्यायाम करायचे. स्वत:ला ते फिट ठेवत होते. मानसिक दृष्या ते कणखर होते. स्वत:ची भूमिका काय आहे? त्याचा आभ्यास कसा करायचा?  हे शिकवणारी  जयंत सावरकर ही आमची एक युनिव्हर्सिटी होती .  चांगलं काम करा असा आशीर्वाद ते प्रत्येकालाच देत होते.'


नाटक आणि चित्रपटांमध्ये जयंत सावरकर यांनी केले काम


'अपराध मीच केला' (गोळे मास्तर), 'अपूर्णांक', 'अलीबाबा चाळीस चोर', 'अल्लादीन जादूचा दिवा', 'आम्ही जगतो बेफाम', 'एकच प्याला' अशा अनेक नाटकामधील जयंत सावरकर यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नाटकांबरोबरच त्यांनी चित्रपटांमध्ये देखील काम केलं होतं. येड्यांची जत्रा,बिस्कीट,विघ्नहर्ता महागणपती, हरिओम विठ्ठला, पोलीस लाईन या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. तसेच सिंघम, वास्तव : द रिॲलिटी, बडे दिलवाला या हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी महत्वाची भूमिका साकारली.


इतर महत्वाच्या बातम्या:


Jayant Sawarkar : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन; वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास