Jaideep Ahlawat Birthday Special : बॉलिवूड अभिनेता जयदीप अहलावत म्हणजेच प्रेक्षकांचा आवडता 'हाथीराम चौधरी' याचा आज 8 फेब्रुवारी रोजी 44 वा वाढदिवस आहे. 'पाताल लोक' वेब सीरिजमध्ये 'हाथीराम चौधरी' या भूमिकेमुळे अभिनेता जयदीप अहलावत याला प्रसिद्धी मिळाली. पाताल लोक वेब सीरिजचे दोन्ही सीझन एकापेक्षा एक हिट ठरले आणि कलाकारांचं खूप कौतुक झालं. त्यातच जयदीप अहलावत याला स्टारडम मिळाला. अभिनेता जयदीप अहलावतने पाताल लोक सीरिजमधून पुन्हा एकदा दाखवून दिलं की, तो एक उत्तम अभिनेता आहे.
सैन्यात भरती होण्याचं स्वप्न अपूर्ण
जयदीप अहलावतने पाताल लोक वेब सीरीजच्या दोन्ही सीझनमध्ये आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये सुपरस्टारचा दर्जा मिळवला आहे. पण अनेकांना माहित नसेल की, जयदीप अहलावतला अभिनयात रस नव्हता, त्याला अभिनय क्षेत्रात करिअर करण्याची मुळीच इच्छा नव्हती. हरियाणातील रोहतक येथील रहिवासी जयदीपचा जन्म एका जाट शेतकरी कुटुंबात झाला. जयदीप अहलावतला लष्करी अधिकारी व्हायचं होतं, पण अनेक वेळा प्रयत्न करूनही जयदीप स्टाफ सिलेक्शन बोर्ड मुलाखतीत उत्तीर्ण होऊ शकला नाही आणि त्याचं सैन्यात भरती होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिले.
फिल्म इंडस्ट्रीची वाट धरली अन् मिस्टर परफेक्शनिस्टही झाला फॅन
सैन्यात भरती होण्याची जयदीपचं स्वप्न अपूर्ण राहिल्यावर, तो थिएटरकडे वळला आणि त्यात इतका रमला की, त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. जयदीप अहलावतने अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या, पण त्याला खरी ओळख 'पाताल लोक' वेब सीरीजमधील 'हाथीराम चौधरी'च्या भूमिकेमुळे मिळाली. जयदीप अहलावतची ही रेकॉर्डब्रेक वेब सीरीज बंपर हिट ठरली.
आमिर खानचा व्हिडीओ कॉल
या भूमिकेसाठी त्याला केवळ प्रेक्षकांकडूनच नव्हे तर मनोज बाजपेयी आणि आमिर खान सारख्या दिग्गज अभिनेत्यांकडूनही कौतुकाची थाप मिळाली. जयदीपने पुढे सांगितलं की, एक दिवस बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने त्याला व्हिडीओवर कॉल करून कौतुक केलं. दरम्यान, सुरुवातीला त्याला वाटलं की, कोणीतरी त्याच्याशी मस्करी करत आहे, पण नंतर जेव्हा आमिरचा व्हिडीओ कॉल आला तेव्हा त्याला कळलं की, तो आमिर खानचं आहे. जयदीपने सांगितलं की, आमिरने त्याला विचारले, तू या भूमिकेसाठी कशी तयारी केलीस? जयदीपने सांगितलं की, आमिर खानसारखा अभिनेता, जो स्वतः प्रत्येक पात्राची तयारी करण्यात तज्ज्ञ आहे, तो त्याला हे प्रश्न विचारत होता, त्याने आमिरला त्याच्या संघर्षाबद्दल आणि तयारीच्या त्या काळाबद्दल सांगितलं.
'पाताळ लोक 2' साठी जयदीपने 'इतके' पैसे घेतले
'पाताल लोक'चा पहिला सीझन 2020 मध्ये आला होता, ज्यासाठी जयदीपने 40 लाख रुपये फी घेतली होती आणि आता 'पाताल लोक सीझन 2' 17 जानेवारी 2025 पासून प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होत आहे. 'पाताळ लोक 2' साठी जयदीप अहलावतने 20 कोटी रुपये फी म्हणून घेतली आहे. जयदीपने पहिल्या सीझनपेक्षा 50 पट जास्त फी आकारली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :