मुंबई: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिला कोट्यवधी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबत (Sukesh Chandrasekhar) आरोपी करण्यात आलं आहे. अंमलबजावणी संचालनालयाने तिच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, जॅकलिनला सुकेशने 10 कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या आणि हा पैसा सुकेशने केलेल्या 200 कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणातला होता. जॅकलिनला याची पूर्वकल्पना असताना तिने ही भेटवस्तू स्वीकारल्यामुळे जॅकलिनला या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. 


ईडीच्या आरोपपत्रामध्ये सुकेशने जॅकलीनला 52 लाख किमतीचा घोडा आणि नऊ लाख किमतीचे एक पर्शियन मांजर तसेच 10 कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या होती. सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनच्या कुटुंबीयांना USD 1 लाख आणि AUD 2,67,40 भेट दिले होते. हा सगळा पैसा फसवणूक करुन सुकेशने मिळवला होता. गुन्ह्याचा पैसा वापरल्यामुळे जॅकलिन आज अडचणीत आली आहे. 


जॅकलिनने गेल्या वर्षी अंमलबजावणी संचालनालयाकडे नोंदवलेल्या तिच्या जबाबात म्हटलं होतं की तिला सुकेशने गुची आणि चॅनेलच्या डिझायनर बॅग आणि कपडेदेखील दिले होते. इतकंच नव्हे तर तिला चंद्रशेखरकडून बहुरंगी दगडांचे ब्रेसलेट आणि दोन हर्मीस ब्रेसलेट देखील मिळाले. या शिवाय सुकेशने तिला मिनी कूपर कारही भेट दिली होती, पण तिने ती परत केल्याचं ईडीला सांगितले. सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसच्या वतीने एका पटकथा लेखकाला तिच्या वेब सीरिजच्या प्रोजेक्टसाठी आगाऊ रक्कम म्हणून 15 लाख रुपये दिले होते.  ईडीचा आरोप आहे की, गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेतून भेटवस्तू खरेदी केल्या गेल्याची माहिती जॅकलिन होती. चंद्रशेखरने त्याची दीर्घकाळची सहकारी पिंकी इराणीली जॅकलिनला भेटवस्तू देण्यासाठी ठेवले होते. 


जॅकलिनला सध्या अटक केली जाणार नाही, कारण कोर्टाने अद्याप ईडीच्या आरोपपत्राचा स्वीकार केले नाही. पण भविष्यात जॅकलिनला अटक होण्याची शक्यता आहे. तसंच जॅकलिनला वकील ईडीच्या आरोपपत्राविरुद्ध उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचं ही सांगितले जात आहे. 


ईडी जॅकलिनला अटक करते का आणि तिला सुकेश विरुद्ध माफीचा साक्षीदार करते का हे येणार काळच सांगेल. पण ईडीचा दावा आहे ती त्यांच्याकडे जॅकलिन विरुद्धही सबळ पुरावे आहेत. स्वःता जॅकलिनने हे मान्य केलं होतं की ती सुकेशला 2017 पासून ओळखते आणि तिने आणि तिच्या परिवाराने सुकेशकडून पैसे घेतले होते. पण ते पैसे सुकेशने कुठून आणले याबद्दल तिला माहिती नव्हती. पण ईडीचा दावा आहे की जॅकलिन सुकेशला जेलमध्ये ही भेटायची आणि तिला सुकेशबद्दल पूर्ण माहिती होती. या आधी सुकेश आणि जॅकलिनचे सार्वजनिक झालेले प्रायव्हेट फोटो त्याचा एक पुरावा आहे. असे अनेक पुरावे जॅकलिनला अडचणीत आणत आहेत, ज्यामुळे जॅकलिनवर आता अटकेची टांगती तलवार आहे.