मुंबई : लग्नानंतर माहेर आणि सासर अशी दोन्ही आडनावं लावणारी ऐश्वर्या राय-बच्चन, शिल्पा शेट्टी-कुंद्रा असो वा माहेरचीच आडनावं लावणाऱ्या माधुरी दीक्षित, रविना टंडन यासारख्या अभिनेत्री. सर्वसामान्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत अनेक महिलांना लग्नानंतर आडनाव काय लावावं, हा प्रश्न पडतो. अभिनेत्री ट्विंकल खन्नाने असाच प्रश्न विचारणाऱ्या एका ट्विटराईटला सडेतोड उत्तर दिलं आहे.
'माझं नाव ट्विंकल खन्ना आहे, कुमार नाही, आणि तेच कायम राहील' असं मिसेस फनीबोन्स या नावाने कॉलम लिहिणाऱ्या अभिनेत्रीने स्पष्ट केलं आहे. प्रभाकर नावाच्या एका ट्विटर यूझरने अत्यंत उद्धटपणे तिला 'ट्विंकल खन्ना का? तू आता कुमार आहेस' अशी आठवण करुन दिली. यावर साहजिकच ट्विंकलचा पारा चढला आणि तिने तिच्या पद्धतीने उत्तर दिलं आहे.
'अनेक जण मला हा प्रश्न विचारतात. अर्थात हे महाशय जितका जोर देऊन विचारत आहेत, तितकंही नाही. पण खन्नाच कायम राहील' असं लिहीत #MarriedNotBranded हा हॅशटॅग ट्विंकलने ट्वीटच्या शेवटी वापरला आहे.

https://twitter.com/mrsfunnybones/status/778104561848487936
अभिनेता अक्षय कुमारचं खरं नाव राजीव भाटिया आहे. ट्विंकल अक्षयचा उल्लेख करताना 'मिस्टर के' असा करते. ट्विंकल ही दिवंगत अभिनेते, सुपरस्टार राजेश खन्ना आणि अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची कन्या. 1995 मध्ये 'बरसात'मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यापासूनच तिने ट्विंकल खन्ना हे नाव कायम ठेवलं आहे. ट्विंकलचे 'मेला', 'बादशाह', 'जुल्मी' यासारखे चित्रपट गाजले होते. 2001 मधला 'लव्ह के लिये कुछ भी करेगा' हा तिचा अखेरचा चित्रपट आहे.
2001 मध्ये अक्षय आणि ट्विंकल विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर ट्विंकल बॉलिवूडमध्ये फारशी दिसली नाही, मात्र अक्षयच्या भूमिका असलेले 'पतियाला हाऊस', 'खिलाडी 786', 'हॉलिडे' या चित्रपटांची ती सहनिर्माती होती. त्याचप्रमाणे तिचा इंटिरियर डेकोरेशनचा व्यवसायही सुरु आहे.
दोघांना 14 वर्षांचा आरव आणि तीन वर्षांची नितारा ही दोन मुलं आहेत. सध्या तिचं लेखनामध्ये करिअर सुरु असून 'मिसेस फनीबोन्स' या पुस्तकामुळे ती 2015 मधील बेस्ट सेलर लेखिका ठरली. त्याचप्रमाणे ट्विंकल तिच्या तिरकस ट्वीट्ससाठी अत्यंत प्रसिद्ध आहे.