मुंबई : बॉलिवूडचा मोस्ट डिझायरेबल अभिनेता हृतिक रोशन आणि 'क्वीन' कंगना रनौत यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. हा वाद एखाद्या सिनेमाला शोभेल असाच म्हणावा लागेल. प्रत्येक मोठ्या बातमीतून नाट्य शोधणारं बॉलिवूड याबाबतीत मागे कसं राहील?

 
हृतिक-कंगना यांच्यातील या 'सायबरवॉर'वर लवकरच एखादा चित्रपट येण्याची शक्यता आहे. हृतिक-कंगनातील वाद हे एक निमित्तमात्र आहे, हृतिकवर एखादी तरुणी खरंच जीवापाड प्रेम करत पाळत ठेवू शकते. एका हँडसम तरुणाचा पिछा पुरवणाऱ्या एका मुलीवर सिनेमाचं
कथानक बेतल्याचं सुत्रांचं म्हणणं आहे.

 
बॉलिवूडमधील एका प्रथितयश निर्मात्याकडून आणि एका नवोदित दिग्दर्शकाकडून हृतिकला स्क्रिप्ट मिळाल्याची माहिती आहे. सायबर स्टॉकिंग करणाऱ्या तरुणीला हृतिकची व्यक्तिरेखा बळी पडते आणि तो सर्वांच्या चर्चेचा विषय ठरतो, अशी सिनेमाची कथा असेल.

 
हृतिक सध्या 'काबील' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे त्याच्याकडे इतर सिनेमांसाठी वेळ नाही. मात्र त्याने स्क्रिप्ट ऐकण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं. त्यामुळे कंगना-हृतिकमधील वादाशी साम्य असलेला हा चित्रपट हृतिकने स्वीकारला, तर स्वतःवर
आधारित चित्रपटात खुद्द हृतिकच काम करताना दिसेल.