मुंबई : चतुरस्र अभिनेता इरफान खान यांच्या निधनानंतर त्यांचं कुटुंब चर्चेत आलं. त्यातही इरफान यांचा मुलगा बाबिलकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या. इरफान गेल्यानंतर बाबिल काय पोस्ट करतो.. तो घरी कसा राहतो याकडे अनेकांचं लक्ष होतं. बाबिलनेही त्यानंतर काही काळ आपल्या वडिलांबद्दलच्या आठवणींना उजळा दिला होता. त्यांच्यासोबतचे किस्से, त्यांच्यासोबतचे फोटो तो पोस्ट करत असे. आता बाबिल पुन्हा चर्चेत आला कारण, त्याच्याकडे काही चित्रपट आले आहेत. नेटफ्लिक्सचा 'काला' हा त्यापैकी एक चित्रपट आहे. तर दुसरा चित्रपट नुकताच शुजित सिरकार यांनी जाहीर केला आहे. पण आता बाबिल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तो त्याच्या एका निर्णयामुळे. 


बाबिलला मिळणारे सिनेमे पाहता आता तो हिंदी सिनेसृष्टीत स्थिरावेल अशी आशा बाळगली जात आहे. अजून त्याचे जाहीर झालेल्या दोन्हीपैकी एकही सिनेमा जाहीर झालेला नाही. पण बाबिलने मात्र आता यानिमित्ताने आपलं सगळं लक्ष अभिनयावर केंद्रित करायचं ठरवलं आहे. म्हणून बाबिलने एक मोठा निर्णय घेतला आहे. बाबिलने आता शिक्षणाला रामराम ठोकायचा निर्णय घेतला आहे. बाबिलने सोमवारी इन्स्टावर पोस्ट लिहून आपला निर्णय जाहीर केला. युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टमिन्स्टरमधून तो शिक्षण घेत होता. पण आता त्याने युनिव्हर्सिटीतून नाव काढून घ्यायचं ठरवलं आहे. 


आपला हा निर्णय जाहीर करतानाच त्याने एक पोस्टही लिहिली आहे. यात तो म्हणतो, "माझ्या मित्रांनो मला तुमची उणीव भासत राहणार आहे. मला इथे खूपच कमी मित्र आहेत. अगदी 2 किंवा 3 म्हणता येतील असे. तुम्ही सगळ्यांनी मला एखाद्या कुटुंबासारखी माया दिली. मला माझं घर असल्याची भावना दिली. माझं तुमच्यावर प्रेम आहे. पण आता फिल्म बीएमधून मी बाहेर पडतो आहे. 120 क्रेडिटचा हा कोर्स आहे. पण आता मी याबद्दल अभिनयाकडे लक्ष केंद्रित करणार आहे. गुडबाय युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टमिन्सटर. तुम्ही माझे खूप खरे मित्र आहात." 






बाबिलच्या या पोस्टमुळे तो आता परदेशात परत जाणार नाही याची माहिती त्याने दिली आहे. पण आता भारतात राहून अभिनयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तो आता आणखी काही कोर्स करणार आहे की इथल्या कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये दाखल होणार आहे ते अद्याप कळायला मार्ग नाही. सध्या त्याच्या हातात दोन सिनेमे असल्यामुळे इथून पुढे या दोन्ही सिनेमांसाठी तो काम करणार असल्याचं कळतं. बाबिलने ही पोस्ट इन्स्टावर शेअर करतानाच फोटो टाकताना हाती कॅमेरा असल्याचे फोटो टाकले आहेत. हे एखादे कॅंडिड फोटो वाटावेत असे ते आहेत. आता बाबिल भारतीय चित्रपटात आपल्या अभिनयाचा कसा ठसा उमटवतो त्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.