International Dance Day 2023 : जगभरात 29 एप्रिल हा दिवस 'आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस' (International Dance Day 2023) म्हणून साजरा केला जातो. नृत्य ही जगाला जोडणारी भाषा आहे. त्यामुळेच जगभरात हा दिवस नृत्याला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. भरतनाट्यम, कथ्थक, कुचिपुडी, भांगडा, गरबा, घूमर, तमाशा, लावणी हे भारतीय नृत्य प्रकार खूपच लोकप्रिय आहेत. आज आंतरराष्ट्रीय नृत्यदिनानिमित्त गाजलेल्या लावण्यांबद्दल जाणून घ्या...
दिसला गं बाई दिसला (Disla Ga Bai Disla) : 'दिसला गं बाई दिसला' ही लावणी 'पिंजरा' या सिनेमातील आहे. जगदीश खेबूडकरांनी लिहिलेल्या या लावणीला राम कदम यांचं संगीत आहे. उषा मंगेशकरांनी गायलेल्या या लावणीवर अभिनेत्री संध्या थिरकताना दिसल्या.
अप्सरा आली (Apsara Aali) : 'नटरंग' या सिनेमातील 'अप्सरा आली' ही लावणी खूपच गाजली. ही लावणी मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीवर चित्रीत झाली होती. गायिका बेला शेंडेने ही लावणी गायली होती. सोनाली कुलकर्णीच्या अदाकारीने या लावणीला चारचांद लावले.
वाजले की बारा (Wajle Ki Bara) : 'नटरंग' सिनेमातील 'अप्सरा आली' या लावणीप्रमाणे 'वाजले की बारा' ही लावणीदेखील प्रचंड गाजली. अमृता खानविलकरने ही लावणी सादर केली होती. अजय-अतुल या लोकप्रिय जोडीने या लावणीला संगीत दिलं आहे. तर बेला शेंडेने ही लावणी गायली आहे.
उगवली शुक्राची चांदणी (Ugvali Shukrachi Chandni) : 'दे धक्का' या लोकप्रिय सिनेमातील 'उगवली शुक्राची चांदणी' ही लावणी खूपच गाजली. शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर यांनी ही लावमी गायली असून अजय-अतुल-समीर यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे.
बुगडी माझी सांडली गं (Bugadi Majhi Sandli Ga) : 'बुगडी माझी सांडली गं' ही लावणी गायिका आशा भोसले यांनी गायली आहे. या सदाबहार लावणीचे बोल ग दी माडगूळकरांनी लिहिले असून राम कदम यांनी संगीतबद्ध केली आहे. ही लावणी जयश्री गडकर यांच्यावर चित्रीत करण्यात आली आहे.
सोळावं वरीस धोक्याचं (Solav varis Dhokyach) : 'सवाल माझं ऐका' या सिनेमातील 'सोळावं वरीस धोक्याचं' ही लावणी प्रचंड गाजली. सुलोचना चव्हाण यांनी ही लावणी गायली असून वसंत पवार यांनी या लावणीला संगीत दिलं आहे. अभिनेत्री जयश्री गडकर यांच्यावर चित्रीत झालेली ही लावणी खूपच गाजली.
या रावजी तुम्ही बसा भावजी (Ya Ravji Tumhi Basa Bhavaji) : गायिका आशा भोसले यांनी गायलेली 'या रावजी तुम्ही बसा भावजी' ही लावणी नृत्यांगणा सुरेखा पुणेकर यांनी सादर केली होती. जगदीश खेबूडकरांनी बोल लिहिलेल्या या लावणीचे अनिल अरुण संगीतकार होते.
खेळताना रंग बाई (Kheltana Rang Bai) : सुलोचना चव्हाण यांची 'खेळताना रंग बाई' ही बहारदार लावणी आजही सादर केली जाते. विठ्ठ चव्हाण यांनी ही लावणी संगीतबद्ध केली आहे.
संबंधित बातम्या