मुंबई : उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची चहूबाजूंनी कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळ नेस्तनाबूत केल्याची कामगिरी ताजी असतानाच पाकिस्तानी कलाकारांसाठी बॉलिवूडचे दरवाजे बंद झाले आहेत.

'इम्पा' (IMPAA) अर्थात 'इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन'च्या बैठकीत पाकिस्तानी अभिनेते, कलाकार यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 'इम्पा'च्या 77 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराला काम न देण्यावर एकमत झालं. इम्पा ही चित्रपट कर्मचाऱ्यांची बॉलिवूडमधील अग्रगण्य संस्था आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील संबंध स्थिर होत नाहीत, तोवर पाक कलाकारांना बॉलिवूडचे दरवाजे बंदच राहतील. भारतातील एकाही पाकिस्तानी कलाकाराने उरी हल्ल्याचा निषेध नोंदवला नव्हता, ही गोष्टही इम्पातर्फे अधोरेखित करण्यात आली आहे.

पाकिस्तानी कलाकारांना मनसेने 48 तासांच्या आत मुंबई सोडण्याचा अल्टिमेटम दिल्यानंतर अनेक पाक कलाकारांनी काढता पाय घेतला. फवाद खान, माहिरा खान यांनी भारताला रामराम ठोकत पाकिस्तानचा रस्ता धरला होता. त्यामुळे फवादचा 'ऐ दिल है मुश्किल' आणि माहिराची भूमिका असलेला शाहरुखचा 'रईस' अडचणीत येण्याची शक्यता आहे.

उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला आहे. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन, 38 ते 40 अतिरेक्यांचा खात्मा केला.  भारतीय लष्कराच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती आज महासंचालक (लष्करी कारवाई) डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी दिली.

कालच दहशतवादी एलओसी पार करुन भारतात घुसण्याच्या तयारीत होते. मात्र त्याची कुणकुण भारताला लागली. भारतीय जवानांनी थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेक्यांचा खात्मा केला”, असं रणबीर सिंह म्हणाले.

इतकंच नाही तर भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज असल्याचंही रणबीर सिंह यांनी ठणकावून सांगितलं.