हैदराबाद : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनविरोधात हैदराबाद पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हृतिक ब्रँड अॅम्बेसेडर असलेल्या 'कल्ट.फीट' जिमचा सदस्याने केलेल्या तक्रारीनंतर हृतिकसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

या फिटनेस सेंटरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक जणांना सदस्यत्व देऊन नोंदणीच्या वेळी वेळापत्रक पाळण्याबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याचा आरोप शशिकांत नामक व्यक्तीने केला आहे. याविरोधात आवाज उठवल्यानंतर अॅपद्वारे टाईम स्लॉट बूक करण्यापासून आपल्याला रोखल्याचंही तक्रारदाराने म्हटलं आहे. त्यानंतर हृतिक रोशन आणि 'कल्ट.फीट' जिमच्या तिघा अधिकाऱ्यांविरोधात केपीएचबी कॉलनी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आपण गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात 17 हजार 490 रुपयांची फी भरुनही वर्क आऊट करु न दिल्याबद्दल शशिकांत यांनी गेल्या महिन्यात पोलिसात तक्रार केली होती.

एक वर्षासाठी 17,490 ते 36,400 रुपयांच्या रेंजमध्ये वजन कमी करण्यासाठी वेगवेगळी पॅकेजेस या जिमद्वारे दिली गेली. जिमने वजन घटवण्याची हमी दिल्यामुळे आणि हृतिक रोशन ब्रँड अॅम्बेसेडर असल्यामुळे आपण नोंदणी केल्याचं शशिकांत यांनी सांगितलं.