मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या दोन्ही भावंडांच्या आयुष्यात सध्या वादळ आल्याचं चित्र आहे. एकीकडे अर्पिताला मुलगा झाल्याने खान कुटुंब आनंदात असतानाच अरबाज आणि सोहेल यांचं वैवाहिक आयुष्य ढवळून निघालं आहे. मात्र सोहेलच्या आयुष्यात मीठाचा खडा टाकल्याचा आरोप ज्या अभिनेत्रीवर झाला त्या हुमा कुरेशीनेच आता मौन सोडलं आहे.
'ट्विटर हा माझ्या आयुष्यातील घडमोडी तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा मार्ग आहे. त्यामुळे माझ्यासोबत जे काही चांगलं-वाईट घडेल त्याबाबत मीच तुम्हाला ट्वीट करुन माहिती देईन.' असं हुमाने ठणकावून सांगितलं. 'सवंग प्रसिद्धीसाठी काही प्रसारमाध्यमं माझ्याबाबत अफवा पसरवतात. याचं कारणही मला माहित आहे. मी आयुष्यात जे काही मिळवलं आहे, ते मेहनतीच्या जोरावर नसून बॉलिवूडमध्ये ज्याला मानाचं स्थान आहे, त्या व्यक्तीशी असलेल्या जवळीकीमुळे हे मीडियाला दाखवून द्यायचं आहे. हे खेदजनक आहे' असं हुमा म्हणते.
'आधी मी खूप फटकळ होते. मात्र गेल्या काही वर्षांत मी खूप काही शिकले आहे. एक बॉलिवूड अभिनेत्री म्हणून तुम्हाला तसं असून चालत नाही.' असं हुमाने मोकळेपणाने सांगितलं.
गँग्ज ऑफ वासेपूर, बदलापूर, देढ इष्किया सारख्या चित्रपटातून प्रसिद्ध झालेल्या हुमा कुरेशीचं नाव सोहेल खानशी जोडलं जात होतं. हुमाने सोहेल आणि सीमा यांच्या सुखी संसारात विष कालवल्यामुळे ते काडीमोड घेत असल्याच्या चर्चा जोरावर होत्या. मात्र हुमाने या सर्व अफवा फेटाळून लावत आपली बाजू स्पष्ट केली आहे.