मुंबई: ऋतिक रोशनचा आगामी सिनेमा ‘सुपर 30’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, पण हे  'सुपर 30' म्हणजे नक्की कोण? या सुपर 30 चित्रपटाचा विषय काय? या प्रश्नांची उत्तरं आज रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये आपल्याला मिळाली आहेत. "अब राजा का बेटा राजा नही बनेगा" हा ट्रेलरच्या शेवटी असलेला डायलॉग प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो.


ऋतिक रोशन तब्बल अडीच वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे, ट्रेलर पाहता ऋतिकचं कमबॅक दमदार होणार हे नक्की. या चित्रपटातील ऋतिकचा लूक अत्यंत वेगळा आहे पण या लूकसोबत या पात्रात गरीब मुलांना इंजीनियर बनवण्याची आशा दिसून येते. ऋतिकने एक बिहारी पात्र साकारले आहे, अतिशय योग्य डायलॉग डिलीवरी करत बिहारी बोलीभाषा वापरली आहे. हे ट्रेलर ट्विटरवर शेअर करताना ऋतिकने "नॉट ऑल हिरोज् वेअर केप्स" असं म्हटलं आहे.





कोण आहेत सुपर 30?

सत्यघटनेवर आधारित असलेला सुपर 30 हा प्रसिद्ध गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित आहे. हुशार असलेल्या परंतु गरिबीमुळे मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत गणित शिकवण्याचा उपक्रम त्यांनी बिहारमध्ये 'सुपर-30' या नावाने सुरु केला. या संस्थेकडून मुलांची चाचणी घेऊन त्यातून 30 जणांची निवड केली जाते व त्यांना आयआयटी प्रवेश व इतर अनेक परिक्षांसाठी प्रशिक्षण दिले जाते, याच सुपर 30 विद्यार्थ्यांच्या गुरूवर हा चित्रपट आधारित आहे. विकास बहल यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.तर अनुराग कश्यप, साजिद नादियावाला, विक्रमादित्य मोटवानी हे निर्माते आहेत. ऋतिकचं दमदार कमबॅक होणारा 'सुपर 30' चित्रपट 12 जुलै 2019 रोजी रिलीज होणार आहे.