मुंबई : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन यांच्यासोबत सोमवारी लग्नाचा 46 वा वाढदिवस साजरा केला. बिग बींची ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून लग्नाच्या आठवणींना उजाळा दिला. आपण कशापद्धतीने घाई-गडबडीत विवाहबंधनात अडकलो, त्याचा किस्सा अमिताभ यांनी चाहत्यांसोबत शेअर केला. 3 जून 1973 रोजी अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांनी लग्न केलं.
'ही 1973 ची गोष्ट आहे. मी, जया आणि आमच्या काही मित्रांना लंडनमध्ये सुट्ट्यांसाठी जायचं होतं. त्यावेळी मी आणि जया डेट करत होतो. मात्र माझे वडील, अर्थात कविवर्य हरिवंशराय बच्चन म्हणाले होते, की आम्हा दोघांचं लग्न झालं, तरच आम्ही एकत्र जाऊ शकतो. त्यामुळे मी पेचात पडलो' असं बिग बींनी सांगितलं.
'जर जंजीर सिनेमा हिट झाला, तर तुम्हाला लंडनमध्ये फिरायला नेईन, असं आश्वासन मी माझ्या मित्रांना दिलं होतं. आम्ही कोण कोण जाणार, याबाबत वडिलांनी विचारणा केली, तेव्हा 'जया' हे नावही समोर आलं. तुम्हा दोघांना जायचं असेल, तर लग्न करा आणि मगच जा' असं माझ्या वडिलांनी बजावल्याचं अमिताभ बच्चन म्हणाले. आम्ही दुसऱ्याच दिवशी लग्न केलं आणि रात्री तडक लंडनचं विमान पकडलं, असंही त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिलं आहे.
अमिताभ आणि जया बच्चन यांनी शोले, सिलसिला, अभिमान यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. सेकंड इनिंगमध्ये ते करण जोहरच्या कभी खुशी कभी गम चित्रपटातही एकत्र झळकले होते.
म्हणून मी घाई-गडबडीत विवाहबंधनात, लग्नाच्या 46 व्या वाढदिवशी बिग बींनी सांगितला किस्सा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Jun 2019 11:26 PM (IST)
आम्हा दोघांचं लग्न झालं, तरच आम्ही एकत्र जाऊ शकतो, अशी अट वडिलांनी घातल्यामुळे मी पेचात पडलो, असं बिग बींनी सांगितलं.
फोटो : गेट्टी इमेज
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -