म्हणून हृतिककडून अर्जुन रामपालच्या घरी पुष्पगुच्छ भेट
एबीपी माझा वेब टीम | 25 Jul 2016 07:56 AM (IST)
मुंबई : बॉलिवूडचा मल्टीटॅलेण्टेड स्टार हृतिक रोशनने अभिनेता अर्जुन रामपालच्या घरी फुलांचा गुच्छ पाठवला. हृतिकच्या या कृत्यामुळे साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पण या फुलांमागचं खरं कारण वेगळंच आहे. हृतिक आणि सुझान यांनी 14 वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेतला होता. दोघं विभक्त होण्यामागे अर्जुन रामपाल असल्याच्या चर्चा होत्या. त्याचवेळी अर्जुन रामपाल पत्नी मेहरसोबत काडीमोड घेणार असल्याच्या चर्चांनाही उत आला होता. अर्जुन आणि मेहर यांना दोन मुली आहेत. हृतिकने पुष्पगुच्छ पाठवल्यामुळे अर्जुनला हृतिकने फुलं का पाठवली असतील यावरुन तर्कवितर्क लढवले गेले. मात्र हृतिकने हा पुष्पगुच्छ अर्जुनला नाही तर अर्जुनच्या आईला पाठवला होता. अर्जुन रामपालच्या आईवर अमेरिकेत कॅन्सरचे उपचार सुरु होते. उपचारानंतर त्याची आई नुकतीच भारतात परतली. तिला उत्तम आरोग्य लाभावं या सदिच्छेने हृतिकने ही फुलं पाठवली होती.