मुंबई : दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असलेल्या संजय लीला भन्साळी यांच्या महत्त्वाकांक्षी 'पद्मावती' चित्रपटासाठी कलाकारांची जुळवाजुळव अजूनही सुरुच आहे. पद्मावतीला मिळवण्याची इर्षा असलेल्या अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेसाठी रणवीर सिंगचं नाव जवळपास निश्चित झालं असतानाच, आता हृतिकचं नाव समोर आलं आहे.


 
भन्साळींनी हृतिकसमोर सिनेमाच्या स्क्रीप्टचं वाचन करुन खिल्जीचा रोल ऑफर केल्याचं वृत्त 'डेक्कन क्रॉनिकल्स' या वृत्तपत्राने दिलं आहे. रणवीरने भन्साळींकडे पक्की स्क्रीप्ट मागितल्यामुळेच त्याला डच्चू मिळाल्याची चर्चा आहे. हृतिकपूर्वी संजय यांनी शाहरुखकडेही धाव घेतली होती. मात्र किंग खान त्याचे 200 दिवस शूटिंगसाठी देऊ शकत नसल्यामुळे हा प्रस्ताव हृतिकसमोर ठेवण्यात आला आहे.

 
एकीकडे रणवीर आपणहून भन्साळींकडे परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर दुसरीकडे दीपिकाला दोघांमध्ये मध्यस्थी करावी लागू शकते, असंही म्हटलं जात आहे. हृतिक रोशनने भन्साळींसोबत 'गुजारीश'मध्ये काम केलं आहे. त्याचप्रमाणे 'बाजीराव मस्तानी'तील मुख्य भूमिकेसाठी हृतिकला प्राधान्य दिलं गेलं होतं, मात्र पुढे गोष्टी जुळून न आल्याने ही व्यक्तिरेखा रणवीरच्या पारड्यात पडली आणि त्याने याचं सोनं केलं.

 
दीपिका पदुकोण या चित्रपटात मेवाडची राणी पद्मावतीच्या मुख्य भूमिकेत आहे, रणवीरला ही भूमिका मिळाली असती तर गोलियोंकी रासलीला- रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसली असती.

 
राणी पद्मावतीचे पती म्हणजे राजा रावल रतन सिंगच्या व्यक्तिरेखेसाठी शोधाशोध सुरु आहे. दीपिका तिच्या पतीच्या भूमिकेसाठी मोठ्या कलाकारासाठी आग्रही असल्याचं म्हटलं जात आहे. काही टीव्ही अभिनेत्यांशी राजाच्या भूमिकेसाठी चर्चा सुरु होती, मात्र दीपिकाने छोट्या कलाकारांना कास्ट करण्यास नकार दिल्याचं बोललं जात आहे. राणी पद्मावती आणि राजामध्ये काही इन्टिमेट सीन्स आहेत, तर राणी आणि खिल्जी यांच्यात एकही रोमँटिक सीन नाही.