मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खानची प्रेमकहाणी घटस्फोटानंतरही पाहायला मिळत आहे. एकीकडे हृतिक आणि सुझान पुन्हा लग्न करणार असल्याची चर्चा असताना, दुसरीकडे हे दोघेही लवकरच एकत्र सुट्टीवर जाण्याचा प्लॅन करत आहेत.


हे दोघे गोव्याला फिरण्यासाठी जाणार असल्याचं वृत्त स्पॉटबॉय या वेबसाईटने दिलं आहे. खरंतर घटस्फोटानंतरही हृतिक आणि सुझान मुलांसाठी अनेक ठिकाणी एकत्र दिसतात. पण आता मुलांशिवाय हे दोघे पहिल्यांदाच सुट्टीवर जाणार आहेत. ही ट्रिप खास आहे, कारण दोघांना एकमेकांना वेळ द्यायचा आहे.

आगामी 'सुपर 30' या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करुन बनारसमधून परतलेला हृतिक रोशन 22 मार्च रोजी सुझानसोबत गोव्याला जाणार आहे.

एका वृत्तानुसार, हृतिक आणि सुझान घटस्फोटानंतर चार वर्षांनी पुन्हा लग्न करु शकतात. या दोघांचा 2014 मध्ये घटस्फोट झाला होता. मात्र तरीही हे दोघेही चांगले मित्र आहेत. घटस्फोटानंतरही दोघांचे एकमेकांच्या कुटुंबासोबत चांगलं संबंध आहेत.

हृतिक आणि सुझान एकमेकांसोबत कायम वेळ घालवतात. दोघांनाही आपल्या मुलांच्या पालनपोषणात कोणतीही कमतरता पडू द्यायची नाही. आई-वडील वेगळे झाल्याचा परिणाम मुलांवर होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळेच दोघे पुन्हा एकत्र येण्याचा विचार करत आहेत.

हृति‍क-कंगना वादावरही सुझानने घटस्फोटित पतीची साथ दिली होती.