मुंबई : अक्षयकुमारची भूमिका असलेल्या 'हाऊसफुल 3' चित्रपटाचा ट्रेलर लाँच अत्यंत भव्य पद्धतीने करण्याचा घाट घालण्यात येत आहे. एकाच वेळी 100 शहरांमध्ये सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्याचा दिग्दर्शक साजिद नाडियादवालांचा मानस आहे.

 
100 शहरांमध्ये एकाच वेळी 'हाऊसफुल 3'चा ट्रेलर लाँच करण्यात येणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या शहरातील सुमारे 50 हजार प्रेक्षकांना एकाच वेळी हा ट्रेलर पाहता येईल.

 
मुंबईतील ट्रेलर लाँच चित्रपटात भूमिका साकारणारे अभिनेते अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फाकरी आणि लिजा हेडन यांच्यासोबत दिग्दर्शक नाडियाडवाला उपस्थित राहतील.

 
मुंबईसोबत नाशिक, ग्वालियर, उदयपूर, रायपूर, राजकोट, सुरत, कोटा, पाटणा, गया, रांची, जमशेदपूर आणि बनारस यासारख्या 100 शहरांमध्ये ‘हाउसफुल-3’चा ट्रेलर लाँच होईल.

 
ट्रेलर लाँचनंतर सर्व कलाकार उपस्थितांना एक खास मेसेज देणार आहेत. दिग्दर्शकानेही सिनेमाच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर असल्याचं सांगितलं आहे. ‘हाउसफुल-3’ तीन जून रोजी प्रदर्शित होणार आहे.