नवी दिल्ली : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना 'अतुल्य भारत' अभियानाचे ब्रँड अॅम्बेसेडर करण्याला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. पनामा पेपर्स प्रकरणात बिग बी यांचं नाव आल्यामुळे या निर्णय टाळण्यात आला आहे.

 
अतुल्य भारतचा माजी ब्रँड अॅम्बेसेडर आमीर खानसोबतचा करार संपल्यानंतर अमिताभ बच्चन आणि प्रियंका चोप्रा यांच्या खांद्यावर ही धुरा देण्यात येणार होती. शिवाय थेट मंत्रालयातून अतुल्य भारत अभियानाच्या जाहिरातींसाठी हा करार करण्यात येणार आहे. मात्र जगभरात खळबळ माजवणाऱ्या पनामा पेपर्सनुसार कर चुकवण्यासाठी परदेशात गुंतवणूक करणाऱ्यांच्या यादीत अमिताभ बच्चन यांचं नाव आलं आणि सरकारने सावध पावलं उचलण्याचा निर्णय घेतला.

 
पनामा पेपर्सच्या गौप्यस्फोटानंतर अर्थ मंत्रालयाने चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अहवालानंतर आता मंत्रालय यासंदर्भात निर्णय घेणार आहे. मात्र तूर्तास बिग बी यांच्या नावाचा विचार सोडून देण्यात आला आहे. प्रियंका चोप्रा अतुल्य भारतची एकमेव ब्रँड अॅम्बेसेडर असेल.

 

पनामा पेपर्स लिक प्रकरणी अमिताभ बच्चन यांनी मात्र आरोप फेटाळून लावले आहेत. जगभरातल्या श्रीमंतांच्या काळ्या पैशाचा पर्दाफाश करणाऱ्या या पेपर्स लीक प्रकरणामुळे अमिताभ बच्चनही अडचणीत आले आहेत. ‘इंडियन एक्स्प्रेस’ वर्तमानपत्राच्या बातमीत छापून आलेल्या सी बल्क शिपिंग कंपनी लिमिटेड, लेडी शिपिंग लिमिटेड, ट्रेजर शिपिंग लिमिटेड या कंपन्यांमधील कोणालाही मी ओळखत नाही. तसेच यातील कोणत्याही कंपनीत मी संचालक नाही, असं म्हणत बि बींनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

 

आपल्या नावाचा दुरुपयोग करण्यात आल्याची शक्यताही अमिताभ बच्चन यांनी बोलून दाखवली आहे. बिग बींनी पत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे.

 

जगभरातल्या पत्रकारांनी मिळून पनामा पेपर्स या नावाने ब्लॅकमनी साठवण्याच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. पत्रकारितेच्या इतिहासातील हा आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट मानला जातो. पनामा पेपर्स या नावाने केलेला हा गौप्यस्फोट जगभरात चर्चेचा विषय आहे.

 

जगभरातील अतीश्रीमंत सत्ताधीश, राजकारणी आणि उद्योगपती यांनी आपला ब्लॅकमनी कसा परदेशी पाठवला आहे, याचा खुलासा या पनामा पेपर्समधून करण्यात आलाय. जगभरातील हुकूमशहा आणि सत्ताधीशांच्या यादीत रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचंही नाव आहे. त्याशिवाय युक्रेनचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को, इजिप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक, लिबियाचे मोहम्मद गडाफी, सिरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांचा समावेश आहे.

 

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांचे कुटुंबीय, आईसलँडचे पंतप्रधान तसंच सौदी अरेबियाचे राजे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या काळ्या पैशाबाबत पनामा पेपर्समध्ये उल्लेख आहे.

 

 

पनामा पेपर्स काय आहे?

 

पनामा येथील एका लॉ फर्मचे काही गोपनीय कागदपत्रे लीक करण्यात आली आहेत, त्यामुळे जगभरातील अतिश्रीमंत, बडे राजकारणी, देशांचे प्रमुख त्यांच्याकडील ब्लॅकमनी कसा सुरक्षित ठेवतात किंवा विदेशात पाठवतात याचा उल्लेख आहे. जगभरात व्हिसल ब्लोअर म्हणून चर्चेत आलेल्या एडवर्ड स्नोडेन यानेही हा आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट असल्याचा दावा केलाय. हा गौप्यस्फोट करण्यात एडवर्ड स्नोडेनचा मात्र काही सहभाग नाही.

 

11 दशलक्ष म्हणजे तब्बल एक कोटी दहा लाख पानांचा गोपनीय दस्तावेज या शोध पत्रकारांच्या हाती लागलेत. गेले वर्षभर जगभरातील अनेक शोध पत्रकार या मोहीमेवर काम करत होते. परदेशी पैसे पाठवणं हे बेकायदेशीर नाही, मात्र काही देशांचे प्रमुखच जेव्हा त्यांच्याकडील अतिरिक्त पैसा असा विदेशात छुप्या मार्गाने पाठवतात, तेव्हा नक्कीच संशयास्पद आणि आक्षेपार्ह असतं.

 

यामध्ये 128 राजकारणी आणि बडे अधिकारी यांच्यासह तब्बल 12 देशांचे प्रमुखांचीही नावे आहेत.