मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवींचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत नवनवे दावे आता समोर येत आहेत. याप्रकरणी आता बॉलिवूड वेबसाइट पिंकविला डॉट कॉमने नवा दावा केला आहे. 24 फेब्रुवारीला जेव्हा श्रीदेवींचा मृत्यू झाला त्यावेळी बोनी कपूर त्यांच्या रुममध्ये नव्हता. श्रीदेवी यांना सर्वात आधी हॉटेलमधील स्टाफने बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत पाहिलं. असा दावा पिंकविलाने डॉट कॉमने केला.


24 फेब्रुवारीला हॉटेल स्टाफने श्रीदेवीच्या रुमची बराच वेळा बेल वाजवली. पण आतून कुणाचंच उत्तर येत नव्हतं. त्यामुळे हॉटेल स्टाफने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी श्रीदेवी बाथरुम फ्लोअरवर पडलेल्या दिसून आल्या. त्यावेळी साधारण रात्रीचे अकरा वाजले होते. हॉटेल स्टाफने तात्काळ श्रीदेवींना जवळच्या रुग्णालयात नेलं. तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

दरम्यान, याआधी यूएईमधील वृत्तपत्र खलीज टाइम्सने असा दावा केला होता की, 'शनिवारी रात्री बोनी कपूर मुंबईहून दुबईला आले. त्यानंतर ते श्रीदेवींना सरप्राईज डिनरवर घेऊन जाणार होते. त्यामुळे त्यांनी युएईतील जुमैरा एमीरैट्स टॉवर्स हॉटेलमधील रुममध्ये जाऊन श्रीदेवींना उठवलं आणि 15 मिनिटं बातचीत केली. त्यावेळी बोनी कपूर यांनी आपल्या पत्नीला डिनरसाठी निमंत्रण दिलं. त्यानंतर श्रीदेवी तयार होण्यासाठी वॉशरुममध्ये गेल्या.'

'15 मिनिटं होऊन गेली तरी श्रीदेवी बाहेर आल्या नाही. त्यामुळे बोनी कपूर यांनी वॉशरुमचा दरवाजा ठोठावला. पण तरीही श्रीदेवी यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे बोनी कपूर यांनी जोराचा धक्का देत वॉशरुमचा दरवाजा उघडला. त्यावेळी त्यांना श्रीदेवी बाथटबमध्ये पडलेल्या आढळून आल्या.' असं खलीज टाइम्समध्ये म्हटलं आहे.

'श्रीदेवी यांना त्या अवस्थेत पाहून बोनी कपूर यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. पण श्रीदेवी काही केल्या शुद्धीत येत नव्हत्या. त्यानंतर बोनी कपूर यांनी आपल्या एका मित्राला फोन केला. त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पण तोवर श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता.' अशी माहिती खलीज टाइम्सने दिली आहे.

संबंधित बातम्या :

श्रीदेवी यांना हृदयासंबंधी कोणताही विकार नव्हता : संजय कपूर

'श्रीदेवी बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्या', खलीज टाइम्सचा दावा