पाकिस्तानी असल्याने अवमान, 'हिंदी मीडियम'फेम सबाला अश्रू अनावर
एबीपी माझा वेब टीम | 18 Jan 2018 08:46 AM (IST)
आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सुरक्षा अधिकाऱ्यांच्या संशयास्पद नजरांमुळे अवमानकारक वाटत असल्याचं सबा कमरने सांगितलं.
मुंबई : 'हिंदी मीडियम' या चित्रपटात इरफान खानसोबत झळकलेली पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तानी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहन कराव्या लागलेल्या त्रासाबद्दल सबाने सांगितलं आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सुरक्षा अधिकाऱ्यांच्या संशयास्पद नजरांमुळे अवमानकारक वाटत असल्याचं सबाने सांगितलं. आपण पाकिस्तानी अभिनेत्री असल्यामुळे चेकिंग करताना हा जाच सहन करावा लागतो, असा दावा सबाने केला. हा अनुभव सांगताना सबाला अश्रू अनावर झाले. युरेशियन जॉर्जियाची राजधानी तबलिसीला गेलं असतानाचा किस्सा सबाने 49 सेकंदांच्या व्हिडिओत सांगितला आहे. 'आम्ही एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी तबलिसीला गेलो होतो. सर्व भारतीय क्रूला पुढे पाठवण्यात आलं, मात्र मला अडवलं. त्याचं कारण माझा पासपोर्ट. मी पाकिस्तानहून आले होते. त्यांनी पूर्ण तपास केला. माझी संपूर्ण चौकशी केल्यानंतरच त्यांनी मला पुढे जाऊ दिलं' असं सबा सांगते. 'त्या दिवशी मला आमची खरी जागा समजली. ही इज्जत आहे का आमची? जगात आमचं काय स्थान आहे?' असा प्रश्न सबा कमरने उपस्थित केला. सबा कमर हे पाकिस्तानी चित्रपट आणि टेलिव्हिजन विश्वातील मोठं नाव आहे. उडान, बागी जिनाह के नाम आणि आईना यासारख्या प्रोजेक्ट्समध्ये तिने काम केलं आहे. हिंदी मीडियम चित्रपटातील तिच्या अभिनयाचीही तारीफ झाली होती. पाहा व्हिडिओ :