मुंबई : न्यूयॉर्कमध्ये गेल्या आठवड्यात आयफा सोहळा पार पडला. अभिनेता शहीद कपूर आणि आलिया भट्ट यांना 'उडता पंजाब'मधील सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार देण्यात आला. मात्र या पुरस्कार सोहळ्यात जगभरातील बॉक्स ऑफिसवर धाकड कमाई करणाऱ्या 'दंगल'चं नावही ऐकायला मिळालं नाही.



विविध पुरस्कार आणि विक्रमी कमाई करणाऱ्या 'दंगल'ला एकही पुरस्कार न मिळाल्याने हा चर्चेचा विषय बनला. त्यानंतर आता आयफाच्या आयोजकांनी आता यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

आयफा सोहळ्यात 'दंगल'ला नॉमिनेट करण्यासाठी निर्मात्यांकडून कोणतीही एंट्री पाठवण्यात आली नव्हती. त्यामुळे या सिनेमाला एकही पुरस्कार मिळाला नाही. एंट्री फॉर्म सर्व निर्मात्यांना पाठवला जातो. तो फॉर्म माहिती भरुन आयोजकांना पाठवायचा असतो. मात्र 'दंगल'च्या निर्मात्यांकडून एंट्री फॉर्म आलाच नाही, असं स्पष्टीकरण आयफाच्या आयोजकांकडून देण्यात आलं.



'दंगल'ची एंट्री पाठवली असती, तर आनंदच होता. कारण सिनेमातील दोन्हीही अभिनेत्रींनी दमदार अभिनय केला होता आणि तो आम्हाला आवडलाही होता. मात्र दुर्दैवाने निर्मात्यांकडून एंट्री पाठवण्यात आली नाही, असंही आयफाने म्हटलं आहे.

न्यूयॉर्कमध्ये आयफाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यासाठी बॉलिवूड अभिनेता सलमान खान, कतरिना कैफ, आलिया भट्ट, वरुण धवन, कृती सेनन, सुशांत सिंह राजपूत आणि शहीद कपूर यांसह अनेक कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली.



या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सिनेमाचा मान सोनम कपूरच्या 'नीरजा'ला मिळाला. तर अनिरुद्ध रॉय यांना 'पिंक' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आलं.

'दंगल'ला एकही पुरस्कार न मिळाल्याने सोहळ्यानंतर जोरदार चर्चा रंगली होती. 'दंगल'ने जगभरात जवळपास 1900 कोटी रुपयांची कमाई केली आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या सिनेमात आमिर खानसोबत, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा आणि साक्षी तंवर यांची प्रमुख भूमिका आहे.