मुंबई : देशभरात विविध क्षेत्रातील महिलांनी आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराला #MeToo मोहिमेच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. यामध्ये आता अभिनेता राहुल रॉय यानेही आपली भूमिका मांडली आहे. केवळ अभिनेत्रीच नाही तर अभिनेत्यांनाही सिनेसृष्टीत तडजोड करावी लागते असा खुलासा राहुल रॉयने केला आहे.
अशा प्रकरणांमध्ये चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्याचा सल्लाही राहुल रॉयने दिला आहे. एका कार्यक्रमादरम्यान राहुल रॉयने #MeToo मोहिमेवर हे वक्तव्य केलं.
गेल्या आठ-नऊ वर्षात रिअॅलिटी शो आणि सोशल मीडिया या माध्यमातून अनेक कलाकार समोर आले आहेत. त्यामुळे केवळ अभिनेत्रीच नव्हे तर अभिनेत्यांनाही सिनेसृष्टी पाय रोवण्यासाठी अनेक तडजोडी कराव्या लागतात आणि हे कडवं सत्य आहे. मात्र सिनेसृष्टीत यश मिळवायचं असेल तर शॉर्टकट नाही तर मेहनतीला प्राधान्य द्यायला हवं, असं राहुल रॉय म्हणाला.
सध्या सुरू असलेल्या #MeToo मोहिमेवर बोलता राहुल रॉय म्हणाला की, हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत सिनेसृष्टीत अशा पद्धतीच्या घटना होत आहेत. केवळ सिनेसृष्टीत नाही तर अनेक ठिकाणी अशा दुर्दैवी घटना घडतात. माझ्या मते अशा घटनांच्या योग्य बाजू पडताळण्यासाठी एक समिती स्थापन करायला हवी.
#MeToo चं वादळ
#MeToo या चळवळीअंतर्गत देशभरातील विविध क्षेत्रातल्या महिलांनी आपल्यावर झालेले लैंगिक अत्याचार, गैरवर्तन यांच्याविषयी आवाज उठवायला सुरुवात केली आहे.
अभिनेत्री तनुश्री दत्ता, कंगना रनौत, सोना मोहापात्रा, पूजा भट्ट, फ्लोरा सैनी, ज्वाला गुट्टा यांनीही आपली आपबिती मीडियासमोर सांगितली होती. दिग्गज अभिनेते नाना पाटेकर, संस्कारी बाबूजी अलोकनाथ, गायक कैलाश खेर यांच्यापासून सिनेदिग्दर्शक साजिद खान, विकास बहल, लेखक चेतन भगत, अभिनेता रजत कपूर अशा अनेक जणांवर आरोप झाले आहेत.
#MeToo चं वादळ त्यानंतर नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातही दाखल झालं. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यमंत्री एम जे अकबर यांच्यावर पत्रकार प्रिया रमानी यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.