ट्रॅफिक जाम केल्याप्रकरणी रविना टंडनविरोधात खटला
एबीपी माझा वेब टीम | 16 Oct 2018 11:14 AM (IST)
रविना टंडन 12 ऑक्टोबरला मुझफ्फरपूरमध्ये एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी आली होती.
पाटणा : बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनविरोधात बिहारमधील मुझफ्फरपूर कोर्टात केस दाखल करण्यात आली आहे. रविनामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाल्याचा दावा एका वकिलाने केला आहे. रविना टंडन 12 ऑक्टोबरला मुझफ्फरपूरमध्ये एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी आली होती. त्यावेळी जमलेल्या गर्दीमुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती, असं याचिकाकर्त्या वकिलाने म्हटलं आहे. तक्रारीमध्ये रविना टंडनसह हॉटेलचे मालक असलेल्या प्रणव कुमार आणि उमेश सिंग या पितापुत्राच्या नावाचाही समावेश आहे. या कार्यक्रमामुळे आपण दीर्घ काळासाठी ट्रॅफिक जाममध्ये अडकल्याचं वकिलाने म्हटलं आहे. कोर्टाने 2 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे. 90 च्या दशकात रविना टंडनची भूमिका असलेले अनेक चित्रपट गाजले होते. गोविंदासोबत तिने अनेक विनोदी चित्रपट केले आहेत. गेल्या दहा वर्षांत मात्र रविनाचे फारसे चित्रपट चमकदार कामगिरी दाखवू शकलेले नाहीत.