चंदिगड : टीम इंडियाचा डॅशिंग ऑलराऊंडर क्रिकेटपटू युवराज सिंग आज लग्नाच्या बेडीत अडकला. युवराज आणि ब्रिटिश अभिनेत्री हेजल कीच यांचा विवाहसोहळा चंदिगडपासून चाळीस किलोमीटरवर असलेल्या फतेहगड साहिब गुरुद्वारात संपन्न झाला.
युवराजचं लग्न हे फतेहगड साहिब गुरुद्वारातल्या बाबा राम सिंग डेरात व्हावं ही त्याच्या आई शबनमसिंग यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेनुसारच पारपंरिक शीख पद्धतीनं युवराज आणि हेजलचं लग्न लावण्यात आलं. हेजलनं लग्नविधींसाठी किरमिजी रंगातला लेहंगा परिधान केला होता. युवराजही त्याच रंगातल्या शेरवानीत रुबाबदार दिसत होता.
दोन डिसेंबरला युवराज आणि हेझलचं हिंदू पद्धतीनं पुन्हा गोव्यात लग्न लागेल. त्यांच्या लग्नानिमित्त पाच डिसेंबरला छत्तरपूरच्या फार्महाऊसवर संगीत सोहळ्याचं, तर सात डिसेंबरला दिल्लीत स्वागत समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे.
युवराजसिंग आणि हेजल कीच यांच्या लग्नानिमित्त मंगळवारी रात्री संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. विराट कोहलीची अख्खी टीम इंडिया या संगीत सोहळ्याला उपस्थित होती.
विराट आणि त्याचे शिलेदार मोहाली कसोटी जिंकून, थेट संगीत सोहळ्याला आल्यानं सेलिब्रेशनचा आनंद द्विगुणित झाला होता. युवराज आणि त्याची वधू हेजल यांच्याइतकाच विराटही उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होता. पंजाबी गायकानं धरलेल्या ठेक्यावर विराटनंही ताल धरला होता.