पणजी : तरुणाईवर भुरळ घालणारा 'राधे भैय्या' पुन्हा पडद्यावर झळकण्याची शक्यता आहे. कारण तुफान गाजलेल्या सलमान खानच्या 'तेरे नाम' सिनेमाचा सिक्वल बनवण्याचा विचार, दिग्दर्शक सतीश कौशिक करत आहे. 'तेरे नाम'चा सिक्वल कधी येणार हे मात्र कौशिक यांनी सांगितलं नाही. तेरे नाम हा सिनेमा 2003 मध्ये आला होता. या सिनेमात सलमान खानसोबत भूमिका चावला मुख्य भूमिकेत होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता.
सलमान खान राधे भैय्याची भूमिका साकारत होता, तर भूमिका चावला निर्जराच्या रोलमध्ये होती. राधे भैय्याच्या हेअर स्टाईलने तर कॉलेज तरुणांवर चांगलीच भुरळ घातली होती. शहरांपासून - गावा खेड्यापर्यंत जिकडे-तिकडे 'राधे भैय्या' पाहायला मिळत होते. 'तेरे नाम'च्या सिक्वलबाबत सतीश कौशिक म्हणाले, "माझं ट्विटर 'तेरे नाम 2' च्या मागणीने भरलं आहे. माझ्याजवळ 15 कथा आहेत, ज्या लेखकांनी माझ्या सिनेमांसाठी लिहिल्या आहेत. मी काही कथा निवडल्या आहेत, मात्र जुन्या सिनेमांवर अवलंबून राहायचं का, हे मला माहित नाही" सध्या 'तुम बिन 2', ‘रॉक ऑन 2’ ‘फोर्स 2’ हे सिक्वेल आले आहेत, तर ‘कहानी 2’ हा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.