बजरंगी भाईजान आणि मुन्नी पुन्हा एकदा एकत्र
एबीपी माझा वेब टीम | 24 Aug 2016 03:43 PM (IST)
मुंबई : सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ सिनेमात ‘मुन्नी’ची भूमिका साकारुन अनेकांची कौतुकास पात्र ठरलेली हर्षाली मल्होत्रा पुन्हा एकदा सलमानच्या सिनेमात दिसणार आहे. कबीर खान दिग्दर्शित ‘ट्युबलाईट’ सिनेमात हर्षाली दिसणार असून, या सिनेमातही सलमान खानची प्रमुख भूमिका आहे. सलमान खानने हर्षालीसोबत एक फोटो शेअर केला असून, ज्यामध्ये ‘ट्युबलाईट’च्या सेटवर सलमान आणि हर्षाली दिसत आहेत. सलमान खानची मुख्य भूमिका असलेल्या आणि कबीर खाननेच दिग्दर्शित केलेल्या ‘बजरंगी भाईजान’ सिनेमात हर्षाली मल्होत्रा या चिमुकलीने ‘मुन्नी’ची भूमिका चोखपणे निभावली होती. हर्षालीच्या अभिनयाचं सर्वांकडूनच कौतुक झालं होतं. त्यामुळे ट्युबलाईटमध्ये हर्षाली नक्की कोणती भूमिका साकारते, याचीही सर्वांना उत्सुकता आहे.