मुंबई : ‘बार बार देखो’ने मार्केटिंग स्ट्रॅटेजीच्या परंपरागत पद्धती मोडीत काढत प्रसिद्ध मराठी सिनेमा ‘सैराट’ची पद्धत अवलंबली आहे. ‘बार बार देखो’ लॉन्चिंगआधीच सिनेरसिकांमध्ये उत्सुकतेचा विषय ठरला आहे. यावरुनच या सिनेमाच्या लोकप्रियतेबाबत आपण अंदाज लावू शकतो. मात्र, सिनेरसिकांना उत्सुकता लावण्यासाठी ‘बार बार देखो’ने मराठी सिनेमा ‘सैराट’ची स्टाईल अवलंबली आहे.

 

‘सैराट’ सिनेमाने ट्रेलरआधी गाणं लॉन्च केलं, त्यानंतर गाण्याचा टीझर, त्यानंतर फर्स्ट लूक आणि त्यानंतर पुन्हा एक गाणं, मग सर्वात शेवटी सिनेमाचा संपूर्ण ट्रेलर लॉन्च करण्यात आला.

 

‘सैराट’ सिनेमा रिलीज होण्याआधी त्याची वातावरण निर्मिती करण्यासाठी ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी प्रचंड कामाला आल्याचं म्हटलं जातं आहे. म्हणूनच सैराट सिनेमा मराठीतील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा बनला. आता ‘बार बार देखो’ या हिंदी सिनेमानेही सैराटची मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरण्याचा प्रयत्न केला आहे.

 

‘सैराट’ची मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरत सर्वात आधी गाणं रिलीज केलं आहे. किंबहुना ‘बार बार देखो’चे जवळपास सर्व गाणी आतापर्यंत रिलीज करण्यात आली आहेत.

 

‘बार बार देखो’ सिनेमा 9 सप्टेंबरला रिलीज होणार असून, हा सिनेमा नित्या मेहरांनी दिग्दर्शित केला आहे. धर्मा प्रॉडक्शन आणि एक्सल एंटरटेन्मेंटची निर्मिती आहे.