Har Har Mahadev: सध्या हर हर महादेव (Har Har Mahadev) या चित्रपटावरुन महाराष्ट्रात वाद पेटला आहे. या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या सीन्सवर काही नेते आक्षेप घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काल केलेल्या राड्यानंतर आज त्याच थिएटरमध्ये मनसेनं या चित्रपटाच्या स्पेशल शोचे आयोजन केले आहे. या सर्व प्रकरणानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी काही चित्रपटांचा उल्लेख केला आहे.
'मराठ्यांच्या इतिहासाचा विपर्यास कुठल्या हेतूने? शिवाजी महाराज विरुद्ध बाजीप्रभू देशपांडे हे महाराष्ट्र पचवेल?' असे प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टद्वारे नेटकऱ्यांसमोर मांडले आहेत. तसेच "तान्हाजी", "पावनखिंड" आणि "हर हर महादेव" या चित्रपटांचा उल्लेख जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्टमध्ये केला आसून या चित्रपटांमध्ये दाखवण्यात आलेल्या सीन्सवर टीका केली आहे.
'दर 2-3 महिन्याला एक या वेगाने असे इतिहासाचा विपर्यास करणारे सिनेमे थिएटर, ओटीटी आणि टिव्हीवर येवून तरुण पिढीला खोटा इतिहास शिकवत आहेत.' असंही जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो शो बंद पाडला होता. त्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी हा शो परत सुरु केला. आज पुन्हा एकदा त्याच ठिकाणी मनसे हा चित्रपट सर्व प्रेक्षकांसाठी मोफत ठेवणार आहे. काल ज्या प्रेक्षकाला मारहाण झाली त्याच्या कुटुंबाला आज पुन्हा एकदा हा शो पाहण्यासाठी आमंत्रण दिले असल्याची माहिती मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे.
हर हर महादेव हा चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित देशपांडे यांनी केलं आहे. या चित्रपटात सुबोध भावे, शरद केळकर, ,अमृता खानविलकर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
राज ठाकरेंनी दिले मनसे प्रवक्त्यांना चित्रपटाबाबत न बोलण्याचे आदेश
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मनसेच्या सर्व प्रवक्त्यांना या चित्रपटाबाबत न बोलण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाला राष्ट्रवादीकडून जातीय रंग दिला जात असल्यानं काहीच न बोलण्याची भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. चित्रपटाकडे चित्रपट म्हणून पाहणं गरजेचं आहे, असं राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे मत आहे. राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व प्रवक्त्यांना ‘हर हर महादेव' चित्रपटाबाबत न बोलण्याचे आदेश दिले आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: